राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवाद

अपेक्षा, विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत केले आश्वस्त

0
60

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज आपल्या सांगली दौऱ्यात विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, उद्योजक, डॉक्टर, सीए., ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर अशा विविध घटकांशी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील विकासाबाबत संवाद साधला. तसेच या मान्यवरांकडून त्यांच्या विकास विषयक अपेक्षा, समस्या व संकल्पना जाणून घेतल्या.

लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ आदी उपस्थित होते. यावेळी कांद्याचा अनिश्चित दर, निर्यातशुल्क आणि निर्यातबंदी, सामाजिक समीकरण करताना आरक्षणाचा मुद्दा आदिंसह जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित मुद्दे लोकप्रतिनिधींनी मांडले. तसेच, विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या संवादात सांगलीत उद्योग यावेत, आयटी पार्क, ग्रामीण भागात एमआयडीसी, दळणवळण सुविधा, पुण्यासाठी इंटरसिटी ट्रेन सुविधा, तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळ व्हावे, संस्कृती संवर्धन व पर्यटनवाढीस चालना मिळावी, अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, शिक्षण हा मूलभूत हक्क असून, प्रत्येक गट स्तरावर सर्व सोयी सुविधांनी युक्त आदर्श शाळा होण्यासाठी प्रयत्न करावेत. नीटसारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी शासकीय कोचिंग क्लास होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू. स्वातंत्र्यवीरांच्या प्रलंबित स्मारकांचे बांधकाम विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी तसेच जिल्ह्यात परिपूर्ण आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. उद्योजक व वैद्यकीय क्षेत्राच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत आश्वस्त केले.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या समोर प्रामुख्याने सांगली जिल्ह्याची विविध क्षेत्रातील वस्तुस्थिती व अपेक्षा मांडण्यात आल्या. त्यांनी सर्व प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेत अपेक्षापूर्ती व विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत आश्वस्त केले.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, कायदा व सुव्यवस्था आदि प्रमुख विषयांसह उद्योग क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास, उद्योजकांच्या समस्या, पर्यटन विकासासाठी सुविधांचा विकास, साहित्य, नाट्य, सामाजिक कार्य, कृषि, पर्यावरण, जलसंधारण आदि विषयांतील मान्यवरांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

यावेळी सांगली जिल्ह्यातील साहित्य, नाट्य, सामाजिक कार्य, कृषि, संगीत, चित्रकला, नृत्य, लोककला, क्रीडा, पर्यावरण, जलसंधारण, स्वातंत्र्यचळवळ आदिंशी संबंधित मान्यवरांसह उद्योग क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, वकिली क्षेत्रातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here