उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  उदगीर येथील विविध इमारती, विकास कामांचे लोकार्पण

0
59

लातूर, दि. 30 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज उदगीर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील सुसज्ज प्रशासकीय इमारती, अटल अमृत उदगीर शहर पाणी पुरवठा योजना, कौळखेड व गुडसूर येथील वीज उपकेंद्रांचा यामध्ये समावेश आहे. तसेच उदगीर शहरातील भूमिगत गटार योजनेचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल खान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बी. एस. पांढरे, अधिक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालय

उदगीर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 2 हजार 876 चौरस मीटर आहे. यामध्ये तळ मजल्यावर वाहनतळ (पार्किंग), पहिल्या मजल्यावर तहसीलदार यांचा कक्ष, कॉन्फरन्स हॉल, कोर्ट रूम यासह विविध कक्ष, दुसऱ्या मजल्यावर अभिलेख कक्ष, ईव्हीएम स्ट्राँग रूम, बैठक सभागृह आणि इतर कक्ष आहेत. तिसऱ्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालय असून उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षासह विविध कक्ष, कोर्ट रूम, कॉन्फरन्स हॉल आहे. या इमारतीसाठी सुमारे 10 कोटी 19 लाख रुपये खर्च झाला आहे.

पंचायत समिती इमारत

उदगीर पंचायत समितीच्या नूतन इमारतीमध्ये एकूण चार मजले आहेत. एकूण जवळपास 3 हजार 112 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या इमारतीची उभारणी सुमारे 20 कोटी 17 लक्ष रुपये निधीतून करण्यात आली आहे. गट विकास अधिकारी यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी यांचे सुसज्ज कक्ष, बैठक सभागृह या इमारतीमध्ये तयार करण्यात आले आहेत.

उदगीर प्रशासकीय इमारत

उदगीर येथे सुमारे 14 कोटी 95 लाख रुपये निधीतून तीन मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ सुमारे 5 हजार 532 चौरस मीटर असून तळ मजल्यावर वाहन तळ आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, सहाय्यक दुय्यम निबंधक, कृषि विभागासह विविध शासकीय विभागांची कार्यालये या तीन मजली प्रशासकीय इमारतीमध्ये असतील.

उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन इमारत

उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि उदगीर पोलीस स्टेशनसाठी सुमारे 32 कोटी 54 लक्ष निधीतून दोन मजली इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ जवळपास 10 हजार 957 चौरस मीटर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या इमारतीमध्ये तळमजला व पहिल्या मजल्यावर उदगीर शहर पोलीस स्टेशन आहे. तर दुसऱ्या मजल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे. ही इमारत भूकंप रोधक असून सोलार, अग्निशमन यंत्रणा, अत्याधुनिक कारागृह, बैठक कक्ष, ठाणे अंमलदार कक्ष आदी सुविधांनी सज्ज आहे.

गुडसुर आणि कौळखेड वीज उपकेंद्राचे लोकार्पण

गुडसुर आणि कौळखेड येथे उभारण्यात आलेल्या 33/11 केव्ही वीज उपकेंद्रांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण केले. गुडसुर येथील उपकेंद्रामुळे गुडसुर, डाऊळ, हिप्परगा, डोंगरशेळकी, कल्लुर व इस्मालपुर येथील ग्राहकांना सुरळीत आणि योग्य दाबाने विद्युत पुरवठा करणे शक्य झाले आहे. तसेच कौळखेड येथील उपकेंद्रामुळे जानापुर, शिरोळ, कौळखेड, मल्लापुर, गुर्धाळ, कुमदाळ व जवळपासच्या वाड्या-तांडे यांना उच्च दाबाने वीज पुरवठा होत आहे.

अटल अमृत उदगीर शहर पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

उदगीर शहरासाठी पुढील 30 वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून अटल अमृत उदगीर शहर पाणी पुरवठा योजनेच्या 106 कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली. या योजनेसाठी नांदेड जिल्हातील उर्ध्व मण्यार प्रकल्पातील पाणी आरक्षित करण्यात आले. तसेच याठिकाणी उद्भव विहीर घेवून उदगीर शहरासाठी पाणी आणण्यात आले. या योजनेतून शहरात सुमारे 14 हजार नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच बनशेळकी तलाव व हकनकवाडी जलशुध्दीकरण केंद्र येथे 500 के. व्ही. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या योजनेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले.

उदगीर शहर भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत उदगीर शहर भूमिगत गटार योजनेच्या एकूण सुमारे 349 कोटी 88 लाख रूपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार उदगीर शहर भूमिगत गटार योजनेच्या टप्पा-1 साठी 161 कोटी 4 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here