मुंबई, दि. ३० :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विविध बाबींना मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाणी पुरवठा योजना नफ्यात येण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत आज देण्यात आल्या.
मंत्रालयातील परिषद सभागृहात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संचालक मंडळाचे बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्रन यांच्यासह मजिप्राच्या दिपाली देशपांडे, स्वच्छता मिशन, जल जीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. यानंतर जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानाची आयोजित आढावा बैठक झाली.
बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या तयारीतील कामांचा नियोजन आराखडा, पाणीपुरवठा योजनातील कामे, प्रशासकीय मान्यता, निधी मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात येणारे विविध प्रस्ताव या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी विविध योजना तयार केल्या जातात व नंतर जिल्हा परिषदेस हस्तांतरित केल्या जातात. विविध पाणीपुरवठा योजना नफ्यात येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पाणी बिलांची वसुली वेळेत होण्याची गरज असून पाणी पट्टी बिलाचे शुल्क भरले जात नसल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठा योजनांवर होतो. या अनुषंगाने चर्चा झाली. यावेळी संचालक मंडळांनी सादर केलेल्या विविध बाबींना पाणीपुरवठा मंत्री श्री पाटील यांनी मान्यता दिली.
0000
किरण वाघ/विसंअ/