अटल सेतूवर एमएमआरडीए तर्फे उभारलेली आयटीएमएस प्रणाली योग्य परिवहन आयुक्त कार्यालयाचे स्पष्टीकरण

0
67

मुंबई, दि. ३० : अटल सेतूवर एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) तर्फे उभारण्यात आलेली आयटीएमएस (एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली) योग्य असल्याचे स्पष्टीकरण परिवहन आयुक्त कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहे.

शासनाच्या ११जुलै २०२४ रोजीच्या पत्रान्वये केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम १६७ (ए) मध्ये नमुद केल्यानुसार राज्यातील आयटीएमएस  (इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम /एचटीएमएस(हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) प्रकल्पाकरीता राज्याचे  परिवहन आयुक्त, मुंबई यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे.

त्यानुसार या कार्यालयातील सह परिवहन आयुक्त (अंमल-२)  मुंबई यांनी एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) तर्फे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पाअंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवर लावलेल्या उपकरणांची तपासणी २५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रादेशिक परिवहन पनवेल कार्यालयाच्या पथकासह केली.

या तपासणीमध्ये टोलनाक्यावर ओव्हरस्पीड वाहनांची व टोलनाक्यावर टोल न भरलेल्या वाहनांची तपासणी केली.  तसेच उरण येथील एमएमआरडीएच्या कमांड व नियंत्रण कक्षामधील उपकरणांची तपासणी केली. या तपासणीमध्ये दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांसाठी तेथील उपकरणे योग्य असल्याचे आढळले.

त्यानुसार आज ३० सप्टेंबर २०२४ रोजी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम १६७ (ए) नुसार परिवहन आयुक्त, मुंबई यांनी अटल सेतुवर उभारलेली आयटीएमएस (एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली) योग्य असल्याबाबत प्रमाणपत्र जारी केले आहे. याबाबत प्रकाशित झालेले  वृत्त निराधार आहे, असे स्पष्टीकरण सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

0000

निलेश तायडे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here