दारव्हा शहर विकास योजनेचा पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून आढावा

0
46

यवतमाळ, दि.3 (जिमाका) : दारव्हा शहराचा सुधारीत आणि वाढीव हद्दीचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्याचे प्रारूप प्रसिध्द करण्यात आले आहे. आराखड्याबाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

बैठकीला पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राजय साबळे, नगर पालिका प्रशासनचे सहआयुक्त सुमंत मोरे, दारव्हाचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दारव्हा नगर परिषदेच्या मुळ हद्दीची सुधारीत विकास योजना 2005 मध्ये मंजूर झाली होती. सन 2012 मध्ये नगरपरिषद क्षेत्राची हद्दवाढ झाली. विकास योजना अंमलात आल्यानंतर 20 वर्षातून एकदा सुधारीत करणे आवश्यक आहे. तसेच हद्दवाढ झालेल्या क्षेत्राची योजना हद्दवाढ झालेल्या दिनांकापासून तीन वर्षाच्या आत तयार करून मंजुरीसाठी शासनास पाठवावी लागते.

त्यानुसार दारव्हा नगरपरिषद क्षेत्राची दुसऱ्यांदा सुधारीत व वाढीव हद्दीची विकास योजना तयार करून त्याचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे. या योजनेमध्ये विविध प्रयोजनासाठी आरक्षण प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुपावर आरक्षण, झोनींग, रस्ते याबाबत दि.25 ऑक्टोंबरपर्यंत सूचना, हरकती, आक्षेप मागविण्यात आले आले.

नागरिकांडून प्राप्त झालेल्या सूचना, हरकती, आक्षेपांवर नियोजन समिती व नगर परिषद मार्फत योग्य कारवाई, पुर्तता केली जाईल. आक्षेप नोंदवितांना लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्रांसह विहित वेळेत सादर होणे आवश्यक आहे. विकास आराखड्याबाबत नागरिकांकडून येणाऱ्या आक्षेप, सूचनांची योग्य दखल घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

शहराचा विकास आराखडा नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देतील, यादृष्टीने करण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी बैठकीत केल्या. नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक राजय साबळे यांनी विकास आराखड्याबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here