पाशा पटेल यांचा ‘हरित नायक’ पुरस्काराने सन्मान

मुंबई, दि. 7 : देशामधील बांबू आधारित  उत्पादकांना ‘होमेथॉन-2024’ व्यासपीठ देऊन पर्यावरण रक्षणासाठी बांबू लागवड आणि प्रक्रियेची चळवळ उभारणाऱ्या राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत संतुलित विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांना यंदाचा ‘हरित नायक’ (Green Hero) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

देशामध्ये वास्तू निर्माणाच्या क्षेत्रातील ‘नरेडको’ महाराष्ट्राच्यावतीने ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2024’ या प्रदर्शनाचे आयोजन 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर बीकेसी येथे करण्यात आले होते.

काल झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात नरेडकोचे उपाध्यक्ष राजन बांदेलकर, नरेडको महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत शर्मा आणि नरेडकोचे  सचिव राजेश दोशी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले की, ‘ होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो-2024’ प्रदर्शनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच बिल्डर आणि शेतकरी यांच्यात समन्वय झाला आहे. प्रॉपर्टी प्रदर्शनाच्या जोडीने बांबू आधारित उत्पादने फर्निचर रिअल इस्टेट उद्योजक आणि ग्राहकांच्या पसंतीस पडले आहे.

पाशा पटेल यांनी मानव जातीच्या रक्षणासाठी बांबू लागवड आणि बांबू आधारित उत्पादने वापरणे आवश्यक असल्याचे सांगितले. जवळपास बांधकाम क्षेत्राकडून 28% कार्बन उत्सर्जन होते. ‘घर बांधा पण झाड तोडू नका’ हे तत्व स्वीकारून यापुढील काळात सर्व बांधकाम क्षेत्रातील दरवाजे फर्निचरसह बांबूपासून बनवलेले फ्लोरिंगदेखील वापरण्यावर बांधकाम व्यावसायिकांची सहमती झाली आहे.

होमेथॉन एक्स्पो २०२४ चा प्रसार हा बॉलिवूड मधील प्रसिद्ध जोडी रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी केले होते. १००० हून अधिक असे महाराष्ट्रातील प्रथितयश व्यावसायिकांचे प्रकल्प सादर करण्यात आले. याशिवाय हे प्रकल्प परवडणाऱ्या घरांसह लक्झरी विभागात असून त्यांची किंमत रु १९ लाखांपासून ते रु ९ कोटींपर्यंतचे होते. या प्रदर्शनात काही सवलती जसे ‘नो स्टॅम्प ड्युटी’ किंवा रजिस्ट्रेशन चार्जेससह वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज योजना सुध्दा सादर करण्यात आल्या. या एक्स्पोमध्ये मुंबई आणि एमएमआर रिजनसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल, रायगड, मिरारोड, वसई, विरार इत्यादीसह पुणे, नाशिक आणि नागपूर येथील प्रकल्पही उपलब्ध आहेत.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/