-
बुटीबोरी येथे साकारणार आशिया खंडातील सर्वात मोठा डिस्टिलरी प्रकल्प
-
बार्लीच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी नवी संधी
नागपूर,दि.7 : विदर्भाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या माल्ट डिस्टिलरीच्या माध्यमातून केवळ औद्योगिक क्षेत्रालाच नव्हे तर कृषी क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. या प्रकल्पातून विदर्भासह मराठवाड्यातील सुमारे नव्वद हजार शेतकऱ्यांच्या जीवनात पीक पध्दतीच्या बदलातून परिवर्तन साध्य होणार असल्याने याचा विशेष आनंद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बुटीबोरी येथे पर्नोड रिकार्ड इंडियाच्या माल्ट डिस्टिलरीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, पर्नोड रिकार्ड इंडियाचे सीईओ जॉ टूबूल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, प्रसन्न मोहिले, गगनदीप सेठी आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतीला अधिक शाश्वत व फायदेशिर केल्याशिवाय शेतकऱ्यांना अधिक आर्थिक उत्पन्न मिळणार नाही. हे लक्षात घेऊन पारंपरिक पीक पध्दतीत बदल करुन नवीन फायदेशिर पिकांचे वाण त्यांच्या पर्यंत पोहचले पाहिजेत. शिवाय याला औद्योगिकरणाची, प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाली पाहिजे. कृषी विभाग यासाठी प्रयत्नशिल आहे. या नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून बार्ली उत्पादक शेतकऱ्यांना आपला कच्चा मालासाठी हक्काची बाजारपेठ मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बार्ली पिकाच्या संदर्भात एक मूल्यवर्धित साखळी निर्माण व्हावी, शेतकऱ्यांनी यातून अधिक लाभ मिळावा याच बरोबर वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यासाठी लवकरच कृषी विभाग व पर्नोड रिकार्ड इंडिया यांच्यातही सामंजस्य करार करण्यात येईल, असे ते म्हणाले.
औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी शासन तत्पर आहे. अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. उद्योगाला चालना मिळावी या हेतूने विविध कंपन्यांसमवेत शासनाने केलेले सामंजस्य करार हे भागीदारीचे द्योतक असून पायाभूत सुविधेच्या दृष्टीने शासन कमी पडणार नाही. या प्रकल्पासाठी जी काही मदत लागेल ती शासनातर्फे देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या तीन वर्षात हा प्रकल्प केवळ आशिया खंडातीलच नव्हे तर जागतिक पातळीवरचा सर्वात मोठा म्हणून गणला जावा यासाठी स्वत: पर्नोड रिकार्ड इंडिया कंपनी पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्नोड रिकार्ड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉ टूबूल यांनी प्रास्तविक केले. येथील औद्योगिक विकासाच्या प्रती आम्ही समर्पण भावनेनी कटिबध्द आहोत. महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात योगदान देण्यासह शेतकऱ्यांप्रतीही एक नवी दिशा आम्ही निर्माण करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या दहा वर्षात जवळपास 1 हजार 785 कोटी रुपयांची गुंतवणूक यातून केली जात आहे.
ताडोबा येथे रोप वे…
विदर्भातील अनेक पर्यटन स्थळांपैकी ताडोबा येथील व्याघ्र सफारी ही महत्वाची आहे. पर्यटकांना अनेक उत्तम सुविधा मिळाव्यात यादृष्टीने नाविन्याची जोड आवश्यक असते. हे लक्षात घेऊन फ्रान्स येथील पोमा कंपनीने या ठिकाणी रोप वे साठी आपले लेखी पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले. पोमा कंपनीचे आशिया प्रमुख बेंजामिन यांनी यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद साधून हे पत्र सुपूर्द केले.