पालकमंत्र्यांच्या हस्ते तंत्रनिकेतनमधील उत्कृष्टता, संगणक केंद्राचे उद्घाटन

अमरावती, दि. 7 : शासकीय तंत्र निकेतनमधील उत्कृष्टता केंद्र आणि अद्ययावत संगणक केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी प्रविण पोटे पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजय मानकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी, देशात नवीन शैक्षणिक पद्धत लागू करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने कौशल्यपूर्ण युवक तयार करण्यात येणार आहे. यासाठी व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी भर देण्यात येत आहे. जुन्या शैक्षणिक धोरणात उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य देण्यात येत नसल्यामुळे वेगळे प्रशिक्षण द्यावे लागत होते. आता सुरवातीपासूनच रोजगारक्षम युवक तयार करण्यासाठी शिक्षण देण्यात येणार आहे.

तसेच युवकांना संगणकातील अत्याधुनिक शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्स आणि थ्री डी प्रिंटींग उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. तंत्रनिकेतनमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी संस्थांमध्ये संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच संशोधन केंद्रासाठी केंद्राने 272 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

अमरावती येथील तंत्रनिकेतनला अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी दिला आहे. तातडीने अतिक्रमण काढून संरक्षण भिंत बांधण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

000000