बीड दि. 23 ( जिमाका ) :- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणाने हत्या करण्यात आली, यातील एकही आरोपीला आम्ही सोडणार नाही अशी शासनाची भूमिका आहे हे सांगण्यासाठी व देशमुख कुटुंबीयांना शासन त्यांच्यासोबत खंबीरपणे आहे ही हमी देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश आपणास देत आहोत. शासन सर्वप्रथम तुमच्या सोबत आहे असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज देशमुख कुटुंबीयांच्या सांत्वनाप्रसंगी सांगितले.
उद्योगमंत्री यांच्यासोबतच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट तसेच राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी आज या परिवाराच्या सांत्वनासाठी भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांसोबत देखील चर्चा करून त्यांची म्हणणे ऐकून घेतले.
या प्रकरणात असणारे मुख्य आरोपी तसेच त्यामागील सूत्रधार यांना आठवड्याभरात अटक करून कारवाई करण्यात येईल, असे याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी गावकऱ्यांशी बोलताना सांगितले. श्री. शिरसाट यांनी आज येथे भेट देण्यापूर्वी बीड येथे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेऊन याप्रकरणी होत असलेल्या तपासाची माहिती घेतली.
यावेळी देशमुख कुटुंबीयांनी चर्चा केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आलेली असून न्यायालयीन चौकशी देखील करण्यात येत आहे, त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर दोषीना शिक्षा व्हावी तसेच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत, असेही ते म्हणाले.
पंधरा वर्षे सार्वजनिक जीवनात राहून स्वतःचे साधे घरही न बांधणारे दिवंगत सरपंच देशमुख यांची गावाच्या विकासाची तळमळ त्यांच्या कामातून लक्षात येते व या पुढील काळातही त्याच प्रकारचा विकास या गावात होईल याची खबरदारी शासन घेईल असे सामंत यांनी ग्रामस्थांशी चर्चा करताना सांगितले.
याबाबत सातत्याने मागणी करणाऱ्या राज्यातील सरपंच संघटनेच्या निवेदनाची दखल शासनाने घेतली आहे असेही उदय सामंत यावेळी म्हणाले. देशमुख यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेतर्फे मदत देण्यात येईल असे सांगून सामंत यांनी देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील आम्ही घेत आहोत असे यावेळी सांगितले.
जी घटना घडली ही अतिशय निंदनीय आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण तपासाचे निर्देश दिले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यास शासन कटीबद्ध आहे असे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी भेटीदरम्यान सांगितले.
००००