सातारा दि.25 – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडाची संवर्धन कामे गुणवत्ता व दर्जेदार करा, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
किल्ले प्रतापगड संवर्धन कामाची पाहणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, विजय नायडू आदी उपस्थित होते.
किल्ले प्रतापगड ऊर्जा स्त्रोत असून प्रतापगडाच्या संवर्धन कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून व शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी प्रतापगड संवर्धनाचा स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
प्रतापगड संवर्धनाचे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा प्रतापगड किल्ला होता त्याच पद्धतीने काम व्हावे. कामात कोणतीही हयगय करू नका. या कामासाठी स्थानिक नागरिकांनीही सहकार्य करावे. त्यांची कोणतीही प्रकारे गैरसोय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल, किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेतली जाईल, असे पर्यटन मंत्री श्री देसाई यांनी सांगितले.
किल्ले प्रतापगड परिसरात सुरू असलेल्या शिवसृष्टी कामाची ही पर्यटन मंत्री श्री. देसाई यांनी पाहणी केली.
०००००