लवकरच परिसरात भव्य असा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळाही उभारणार
कोल्हापूर दि. 30 (जिमाका) : शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २९ एकरात राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय नगरी उभारण्याचे काम सुरू आहे. यातील पुर्ण झालेल्या इमारती आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कार्यान्वित झाल्या. यामध्ये मुलींचे वसतीगृह, शवविच्छेदन गृह इमारत, व्याख्यान कक्ष व परीक्षा कक्ष या इमारतींचा समावेश होता.
या इमारतींमधील प्रवेशावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
मागील कार्यकाळात या वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी माझ्यावर होती. ही कामे मंजूर झाली तेव्हा अत्यंत दुरावस्था या परिसरात होती. मात्र आज बघितले तर अतिशय चकाचक हा परिसर झालेला आहे असे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, अजून अनेक इमारतींमध्ये रस्ते व्हायचे आहेत, हॉस्पिटलचे काम सुरु व्हायचं आहे आणि आज मुलींचे हॉस्टेल, पोस्टमार्टम इमारत तसेच अद्यावत परीक्षा हॉल सुरु झाला. आणि हे सर्व काम अतिशय चांगलं करण्यात आलेलं आहे. येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची चांगली सोय करण्याचा प्रयत्न वैद्यकीय शिक्षण विभागाने आपल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये केलेला आहे. एक शाहू महाराजांच्या नावाने वैद्यकीय नगरी या ठिकाणी उभारण्याचे आम्ही ठरवलेले आहे. लवकरच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा करणार आहोत असे त्यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी मुलींच्या अद्यावत अश्या वसतीगृहातील खोल्यांची पाहणी केली. तेथील कार्यालय तसेच इतर सुविधा पाहिल्या. तसेच शवविच्छेदन गृहातील विविध सोयी सुविधांबाबत प्रत्येक ठिकाणी भेट देवून कामांची गुणवत्ता पाहिली. शेंडा पार्क येथील महाविद्यालयातील २९ एकराचा सर्व परिसर पूर्ण क्षमतेने वापरण्यात येत आहे. त्याकरिता या परिसरामध्ये सर्व रस्ते हे काँक्रीटचे करण्यात आलेले आहेत व मुलांना अभ्यास करण्याकरिता चांगले वातावरण राहावे याकरिता लँडस्केपिंगची तरतूद करण्यात आलेली आहे. या कामांमध्ये प्रशस्त भव्य गेट व वाहनतळ, ओपन एअर थेअटर,ओपन जीमचीही तरतूद आहे. सुसज्ज व भव्य अशा राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 250 खाटांच्या कॅन्सर हॉस्पिटल इमारतीचे बांधकाम, 250 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इमारतीचे बांधकाम व 600 खाटांच्या सामान्य रूग्णालय इमारतीचे बांधकाम असे मिळून 567.85 कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले होते. या काम पुर्ण झालेल्या इमारतीं आज कार्यान्वित झाल्या.
00000