पर्यटन धोरण २०२४ ची प्रभावी अंमलबजावणी करावी – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. ८ : राज्यात पर्यटन धोरण २०२४ ची प्रभावी अंमलबजावणी करून देशी व परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विभागाने प्रयत्न करावेत, असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी बैठक झाली. यावेळी बैठकीला पर्यटन विभागाचे सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, राज्यातील गड – किल्ले पर्यटन वाढीसाठी  पुरातत्व विभागाच्या सहकार्याने आवश्यक त्या सुविधांसह बळकटीकरण करून गड – किल्ले यांची माहिती जागतिक पातळीवर पोहचवा.पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, हे लक्षात घेता पर्यटन वाढीसाठी पर्यटन धोरण २०२४ ची प्रभावी अंमलबजावणी करावी.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, राज्यातील प्रत्येक विभाग व हंगामानुसार विविध महोत्सवांचे नियोजनूपर्वक आयोजन करणे, जिथे पर्यटन वाढू शकते अशा ठिकाण शोधून अशा पर्यटनस्थळांचा विकास करणे यावर पर्यटन विभागाने भर द्यावा.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सुरू असलेल्या उपक्रमांना गती द्यावी. सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनावर आधारित पर्यटन उपक्रम राबवावे, असेही ते म्हणाले.

*****

संध्या गरवारे/विसंअ/