सोयाबीन खरेदीतील अडचणी तातडीने दूर कराव्यात – पणन मंत्री जयकुमार रावल

सोयाबीन खरेदीतील अडचणी दूर करण्यासाठी आढावा बैठक

सोयाबीन खरेदीचे पेमेंट जलद गतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश

मुंबई दि. ८ : राज्यात नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (एनसीसीएफ) मार्फत करण्यात येणारी सोयाबीन खरेदी बारदाना अभावी रखडू नये, शेतकऱ्यांना यासाठी कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. बारदान तुटवडा सोयाबीन खरेदीत अडचण ठरू नये यासाठी तात्काळ उपाय योजना करावी. सोयाबीनची खरेदी वेळेत करून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघाने खरेदी रक्कम तीन ते सात दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. अशा सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केल्या. अडचणीतील तात्पुरती उपाययोजना म्हणून सोयाबीन खरेदीसाठी सुस्थितीत असलेले बारदाण शेतकऱ्यांकडून स्विकारले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हंगाम २०२४-२५ अंतर्गत सोयाबीन हमी भावाने खरेदीबाबतच्या अडचणींवर उपाययोजना आणि खरेदीच्या कामकाजाचा आज पणन मंत्री श्री. रावल यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी आमदार कैलास पाटील, आमदार रामराव वडकुते, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे आप्पासाहेब धुळाज, अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, नाफेडचे राज्यप्रमुख भव्या आनंद यांच्यासह 26 जिल्ह्यांचे पणन अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणाले की, नाफेड, मार्केटिंग फेडरेशन, वखार महामंडळ, व संस्था यांनी समन्वयाने काम करून सोयाबीन खरेदीतील अडचणी सोडवाव्यात. तसेच आतापर्यंत खरेदी केलेल्या सोयाबीनची पेमेंट दोन तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. पुढे होणाऱ्या खरेदीचे देयके दोन तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याचे नियोजन करावे. बारदाण खरेदी बाबत पारदर्शक व जलद पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात यावी. सुस्थितीत असलेले बारदाण शेतकऱ्यांकडे असल्यास त्यांच्याकडून ते स्वीकारण्यात यावे. गोडावून उपलब्धता व सुस्थितीबाबत उपाययोजना करावी. सोयाबीन खरेदी वेगाने होईल, अशा पद्धतीची यंत्रणा कार्यान्वित करावी. पोर्टलची तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सोयाबीनची खरेदी वेगाने व पारदर्शक कशी होईल या संदर्भात तात्काळ उपययोजना कराव्यात असे निर्देश मंत्री श्री. रावल यांनी दिले.

गरज असल्यास ग्रेडरची संख्या वाढविण्यात यावी. तसेच ५० किमी पेक्षा जास्त अंतरावर गोडाऊन असल्यास अतिरिक्त निधी संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देशही मंत्री श्री. रावल यांनी दिले. वखार महामंडळाशी समन्वय साधून गोडाऊन संदर्भातील समस्या सोडविण्यात याव्यात. नाफेडसोबत समन्वय साधून प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना मंत्री श्री. रावल यांनी दिल्या.

सोयाबीन विक्रीसाठी आतापर्यंत एकूण सात लाख ४४ हजार ७५७ शेतकऱ्यांची नोंदणी केली असून, दोन लाख सहा हजार ९९० शेतकऱ्यांकडून ४ लाख २६ हजार ०८७ मेट्रीक टन सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे.

0000