स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्धतेसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार – कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

नाशिक, दि.11 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा):  जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानातून स्वयंसहाय्यता बचतगटांना उभारी देण्याचे काम अविरत केले जात आहे. या बचतगटांच्या उत्पादनांना जिल्हा व तालुकास्तरावर कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केले.

आज डोंगरे वसतिगृह मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांनांतर्गत  मिनी सरस व जिल्हास्तरीय स्वयंसहाय्यता समूहांची उत्पादने विक्री व प्रदर्शन 2024-25 उद्घाटनप्रसंगी कृषिमंत्री ॲड . कोकाटे बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल,  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, नवी मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, गट विकास अधिकारी सोनिया नाकाडे,  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिकच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री श्री. कोकोटे म्हणाले की, बचतगटांना उत्पादनांना जिल्ह्यात विविध ठिकाणी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी लवकरच पणनमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.  ‘उमेद’अंतर्गत नाशिक जिल्ह्यात 29 हजार 300 महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून व जवळपास 3 लाख 10 हजार 317 कुटुंब जोडली गेली आहेत. या अभियानांतर्गत 20 हजार 643 समूहांना जवळपास 4 लक्ष निधी वितरित करण्यात आला आहे व 69 हजार 780 महिला यांना 2024-25 या आर्थिक वर्षात ज्यांचे उत्पन्न 1  लाखपेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याने ज्या लखपती दीदी झाल्या आहेत. महिलांचे स्वत:चे उत्पन्न  लाखाहून अधिक होवून त्या स्वयंभू झाल्या पाहिजेत यादृष्टीने शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत.  23 हजार 137 महिलांनी व्यक्तिगत व्यवसाय सुरू केला आहे. शासनामार्फत समुदाय संसाधन व्यक्ती यांना मासिक 6 हजार रूपये मानधन तर गटांना 30 हजार फिरता निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील 2 हजार 500 सीआरपी व 29 हजार तीनशे बचत गटांना फायदा होत असल्याचे ॲड. कोकोटे यांनी सांगितले.

जिल्ह्यात उमेदच्या माध्यमातून महिला सेंद्रीय शेती सुद्धा करीत आहेत. शासनाचे हे उपक्रम वाखणण्याजोगे आहेत. केवळ खाद्य पदार्थच नाही तर इतर उत्पादनांमध्ये महिला अग्रेसर आहेत. यामुळे नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला उपलब्ध होईल व आरोग्याच्या दृष्टीने ही बाब हितवाह आहे. कृषी विभागामार्फत महिला बचतगटांना फवारणी ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ड्रोन फवारणीच्या माध्यमातून खर्चाची बचत होऊन उत्पादन वाढ होईल. प्रदर्शनाचे आयोजन हे उत्पादनांची जाहिरात व्हावी हा आहे. उमेद मार्फत तालुकास्तरावही अशा प्रदर्शनाचे आयोजन केल्यास निश्चित त्याचा फायदा शेतकरी व बचतगटांना होईल. लवकरच कृषी विभागाचे पोर्टल तयार करण्यात येत आहे. या पोर्टलद्वारे नागरिकाना व शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती, योजनेच्या लाभासाठीचे अर्ज, आवश्यक कागदपत्र यांची सर्व माहिती  एकाच ठिकाणी उपलब्ध होवू शकणार असल्याचे कृषिमंत्री श्री. कोकाटे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या उमेद अंतर्गत महिला बचतगटांसाठी केले जाणारे काम स्तुत्य आहे असे सांगून महिलांनी बचत गटांनी केवळ खाद्य पदार्थांचे उत्पादन न करता वेगवेगळया प्रकारची उत्पादने तयार करून व्यापारात उतरावे अशी अपेक्षा आमदार श्री. खोसकर यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी नाशिक व नांदगाव  येथील समूहाने लेझीम बंजारा गीत व नृत्याच्या माध्यमातून उपस्थितांचे स्वागत केले.

 

यांचा मान्यवरांच्या हस्ते झाला सत्कार

ड्रोन दिदी

  1. स्वीटी जगदीश शेळके, ग्रामपंचायत मुखेड, तालुका निफाड

लखतपी दिदी

  1. शीतल सोपान करंजकर, ग्रामपंचायत गोवर्धन, नाशिक
  2. दिपाली संदिप कोरडे, ग्रामपंचायत चांदोरी, ता. निफाड
  3. स्नेहा प्रवीण कणसे, ग्रामपंचायत मुसळगाव, तालुका सिन्नर
  4. हर्षाली रमेश जाधव, ग्रामपंचायत माळेदुमाला, तालुका दिंडोरी
  5. बेबीबाई रवींद्र अहिरे, ग्रामपंचायत हाताणे, तालुका मालेगाव