प्रिन्सटन टाऊनबाबत झेरॉक्सच्या आधारे मुद्रांक शुल्क करावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, ता. 16 : पुण्यातील येरवडा परिसरातील कल्याणीनगरमधील प्रिन्सटन टाऊन को-ऑप हौसिंग सोसायटीसंदर्भात सह जिल्हा निबंधक वर्ग – 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर यांच्याकडे  दाखल तक्रारीबाबत सोसायटी आणि विकासक यांच्यातील वादामध्ये समजुतीच्या करारनाम्याचा (Memorandum of Understanding) दस्त सात दिवसांत तक्रारीसोबत सहजिल्हा निबंधक वर्ग – 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे प्राप्त न झाल्यास उपलब्ध छायांकित प्रतीच्या सत्यतेबाबत विकासकास काही म्हणायचे नाही, असे समजून छायांकित प्रतीच्या आधारे दस्ताची मुद्रांक शुल्क निश्चिती व आवश्यकतेनुसार वसुलीची कार्यवाही सुरू करण्याच्या  सूचना  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  दिल्या.

या संदर्भात महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या दालनात बैठक झाली.  बैठकीस आमदार दीपक केसरकर, उपसचिव  सत्यनारायण बजाज उपस्थित होते.

दाखल तक्रारीची  दखल घेऊन समजुतीचा करारनामामधील पक्षकार (सोसायटी व निष्पादक) यांना तक्रारीतील समजुतीचा करारनामाचे निष्पादन व त्यास मुद्रांक शुल्क न भरण्याविषयी खुलासा सादर करण्यास नोटिसीद्वारे कळविण्यात आले होते. परंतु, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने  सह जिल्हा निबंधक वर्ग-२ तथा प्रशासकीय अधिकारी, पुणे शहर यांना बांधकाम व्यावसायिक यांच्या कार्यालयास समक्ष भेट देऊन मूळ समजुतीचा करारनामा ताब्यात घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे व तो सह जिल्हा निबंधक वर्ग – १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितले आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

0000

एकनाथ पोवार/विसंअ/