शिवाजी विद्यापीठ उत्कृष्टतेचा वारसा कायम ठेवून समाजाच्या प्रगतीत योगदान देत राहील – राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन

शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त सोहळा उत्साहात संपन्न; विद्यापीठामार्फत ५१ हजार ४९२ पदवी प्रमाणपत्रांचे वाटप

कोल्हापूर, दि.१७ : शिक्षणाने प्रामाणिकपणा, करुणा आणि टीकात्मक विचारसरणीसारखे गुण जोपासले पाहिजेत, विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार केले पाहिजे. शिवाजी विद्यापीठ शिक्षणाच्या समग्र दृष्टिकोनातून या तत्वज्ञानाचे उदाहरण देते. शिवाजी विद्यापीठ उत्कृष्टतेचा वारसा कायम ठेवेल आणि समाजाच्या प्रगतीत योगदान देत राहील असा विश्वास महामहीम राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त सोहळ्यात बोलताना व्यक्त केला.

कोल्हापूर ही महान शासक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे, जे देशभरात शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, विशेषतः सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायांमध्ये प्रगतीशील धोरणांसाठी ओळखले जातात. त्यामुळे तुम्ही धैर्य, सामाजिक न्याय आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्टतेच्या महान वारशाचे भाग्यवान वारसदार आहात.  यावेळी ६१ व्या दीक्षान्त सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अर्थात एन.सी.एल.चे संचालक, ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ.आशिष लेले, खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आदी उपस्थित होते.

यावेळी महामहीम राज्यपाल तथा कुलपती, सी.पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात तुमच्यासोबत उपस्थित राहताना मला खूप आनंद होत आहे. आजच्या दीक्षान्त समारंभात पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. या विद्यापीठाला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि विद्यापीठ परिसरात स्थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण जीवनाची आठवण करून देतो. कोल्हापूरमध्ये शेती, उद्योग, आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये विकासाची प्रचंड क्षमता आहे. शिवाजी विद्यापीठाची स्थापना १९६२ मध्ये झाली. तेव्हा विद्यापीठाशी संलग्न फक्त ३४ महाविद्यालये होती. उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी फक्त १४,००० होते. आज ६३ वर्षांनंतर, शिवाजी विद्यापीठात २९९ संलग्न महाविद्यालये आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या २.५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. आपली अंगभूत कौशल्ये, आत्मविश्वास आणि सृजनशीलतेच्या बळावर जगभरात शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी प्रशंसनीय कामगिरी करीत आहेत. विद्यापीठाच्या लौकिकात आपणही निश्चितपणे मोलाची भर घालाल, याची मला खात्री आहे. 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने आपल्या हीरकमहोत्सवी वाटचालीमध्ये गुणवत्ता आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा मानदंड प्रस्थापित केला आहे. दक्षिण महाराष्ट्राच्या शैक्षणिक उत्थानामध्ये या विद्यापीठाने बजावलेली कामगिरी गौरवपूर्ण स्वरुपाची आहे. विविध मूल्यांकन करणाऱ्या संस्थांनीही शिवाजी विद्यापीठाचे देशातील सातत्याने उंचावत असलेले स्थान अधोरेखित केले आहे. यामध्ये नॅकच्या ‘A++’ मानांकनापासून ते NIRF रँकिंग-२०२४मध्ये राज्य विद्यापीठांमध्ये देशात ५१-१०० या बँडमध्ये स्थान प्राप्त केले आहे. येथील संशोधकांनी गेल्या सहा महिन्यांत २५ हून अधिक पेटंट मिळविले आहेत.  यातून विद्यापीठातील उच्च दर्जाच्या संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या PM-USHA अभियानांतर्गत विद्यापीठ सक्षमीकरणासाठी विद्यापीठास २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सरासरी १५ दिवसांच्या आत परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची विक्रमी कामगिरी विद्यापीठ मागील तीन सत्रांत सातत्याने करीत आहे. आधुनिक भारताच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉईंट ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी जनजागृती करणे, त्यासंदर्भातील शासनाची भूमिका सुस्पष्ट करणे आणि सर्व सामाजिक-शैक्षणिक घटकांच्या सहभागातून ती यशस्वी करणे, आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तिचे लाभ मिळवून देणे यासाठी महाराष्ट्र शासन पूर्ण जोमाने काम करीत आहे. 

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक, ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ.आशिष लेले म्हणाले, विद्यापीठाने परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि कौशल्य प्रदान करण्यात उल्लेखनीय काम केले आहे. महाविद्यालयांचे विस्तृत जाळे केवळ या प्रदेशातील विविध पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा देत नाही, तर वैज्ञानिक कुतूहल आणि जिज्ञासेची संस्कृती देखील वाढवते. 

राष्ट्रगीत, राज्यगीत आणि विद्यापीठ गीताने कार्यक्रमाला सुरूवात झाली. कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.