जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई,दि.20 : जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी. पर्यटनातून दोन्ही प्रांतातील परस्पर संबंध अधिक वृध्दिंगत होतील, असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाने पावनगड येथे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, जपानचे वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे संचालक योशीओ यामास्ताचे, जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी, वाकायामाचे सोनोबे सॅन, महिरा हेदुयेकी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, अधिक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे, यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शिष्टमंडळाने पर्यटनवाढीच्या दृष्टीने देण्यात येत असलेल्या सवलती व योजनांची माहिती महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाकडून जाणून घेतली. एप्रिल महिन्यात महाबळेश्वर येथे होणाऱ्या पर्यटन महोत्सवास जरुर यावे, असे आग्रहाचे निमंत्रणही पर्यटनमंत्री श्री.देसाई यांनी दिले.

0000

संध्या गरवारे/स.सं