महामार्गांवर महिला प्रवाशांसाठी प्राधान्याने सुविधायुक्त प्रसाधनगृहांची व्यवस्था करावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

मुंबई, दि. 22 : राज्यभरात विविध महामार्गांवरुन लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यामध्ये प्राधान्याने  महिला  प्रवाशांसाठी  सुविधायुक्त प्रसाधनगृहांची व्यवस्था उपलब्ध करुन देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह  भोसले यांनी दिल्या.

महामार्गांवरील महिला प्रसाधनगृहांच्या सुविधांबाबत मंत्रालय येथे आढावा बैठक झाली. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे (रस्ते), सचिव संजय दशपुते (बांधकामे) यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.भोसले म्हणाले, महिला प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महामार्गांवरील पेट्रोलपंपांच्या शेजारी, टोल नाक्याजवळ किंवा इतर सुयोग्य ठिकाणी सुविधांयुक्त प्रसाधन गृहांची व्यवस्था उभारण्यास प्राधान्य द्यावे. तसेच 25 किमीच्या रस्त्यांच्या कामांच्या प्रस्तावांमध्येच या बाबींचा समावेश करावा. सर्व स्वच्छतागृहांची रचना एकसारखी  ठेवावी.  त्याचप्रमाणे प्रसाधनगृहांच्या येथे कटाक्षाने स्वच्छता राखण्यात यावी. आवश्यक प्रमाणात लाईटची व्यवस्था ठेवली जावी. सुरक्षेच्या दृष्टीने प्रसाधन गृहांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. या सर्व बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रसाधन गृहांची व्यवस्थापन यंत्रणा महिला बाल विकास विभागाच्या सहकार्याने कार्यान्वित करण्यात यावी. स्थानिक महिला बचतगटांना व्यवस्थापनाचे काम सोपवण्यात यावे, जेणेकरुन नियमितपणे प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्याचे काम नियंत्रित केले जाईल, असे श्री. शिवेंद्रसिंह भोसले यांनी सूचित केले.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिला व बाल विकास विभागाकडून महिला बचतगटांना या कामात सहभागी करुन घेता येईल, असे सांगितले.

००००

वंदना थोरात/विसंअ/