मुबंई, दि. २२ : शेवगाव पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्ग ७५२ ई पैठण पंढरपूर (पालखी मार्ग) व करावी. राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ खरवंडी ते नवगण राजूरी या रस्त्यांच्या दुपदरीकरणाची कामे दर्जैदार ही कामे गतीने पूर्ण करावी, भूसंपादनातील अडचणी त्वरीत सोडविण्यात याव्या, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले यांनी येथे दिल्या.
बांधकाम भवन येथे शेवगाव पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्ग ७५२ ई पैठण पंढरपूर (पालखी मार्ग) व राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ खरवंडी ते नवगण राजूरी या महामार्गाच्या संदर्भात बैठक झाली. यावेळी, आमदार मोनिका राजळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते (बांधकामे) यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.भोसले म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग ७५२ ई पैठण शिरुर रस्त्याचे दुपदरीकरण करण्याच्या कामात ज्या गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही, त्याठिकाणी संबंधितांनी स्थानिकांना विश्वासात घेऊन भूसंपादनाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे. ज्या भागात काम सुरु झाले आहे त्याठिकाणी संबधित कंत्राटदारांनी गांर्भियाने कामाचा दर्जा राखावा. विहीत कालमर्यादेत काम पूर्ण करण्यावर कटाक्षाने लक्ष द्यावे. तसेच ज्या गावातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्याच्या मावेजा मिळण्याबाबतचा प्रस्ताव संबंधितांनी सादर करावा. मार्च एप्रिल २०२५ पर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन अहिल्यानगर जिल्ह्यातील उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे.
राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ खरवंडी ते नवगण राजूरी रस्त्याचे दुपदरीकरणाचे कामास गती देण्यात यावी, या भागातील १४.३० किमीमधील अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने यंत्रणा कार्यान्वित करावी. अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या गावांचे अंतिम निवाडा त्रुटीच्या पूर्ततेसाठी प्रलंबित आहे त्यासंदर्भात स्थानिक जिल्हाधिकारी यांना विभागाने पत्र देऊन या कामासंदर्भातील बाबी तत्परतेने पूर्ण करण्याचे सूचित करावे. लोकांना सोयीचे होईल अशा पद्धतीने सर्व कामांची पूर्तता करावी. या सर्व कामांची गुणवत्ता व गती याची विभागाने पडताळणी करावी,अशा सूचना मंत्री श्री. भोसले यांनी संबंधितांना दिल्या.
0000
वंदना थोरात/विसंअ/