मुंबई, दि. 22 : हाफकीन जैव औषध महामंडळाने अनेक लसींचे संशोधन करून उत्पादन घेतले आहे. हाफकीन ही एक नावाजलेली संस्था आहे. हाफकीनने संशोधीत केलेली सर्पदंशावरील लस सर्वत्र परिचित आहे. महामंडळाने भविष्यातही अशाप्रकारच्या लसी, औषधांमध्ये नवनवीन संशोधन करावे, त्यासाठी शासन नेहमी संस्थेच्या पाठीशी उभी राहील, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी हाफकीन जैव औषध निर्माण महामंडळाला भेट दिली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, महाव्यवस्थापक (उत्पादन) डॉ. प्रदीप घिवर, व्यवस्थापक (प्रशासन) नवनाथ गर्जे, व्यवस्थापक संपदा पटवर्धन आदी उपस्थित होते.
श्री. आबिटकर म्हणाले, महामंडळाकडील खरेदी कक्ष सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्याकडे ठेवावा. औषधांच्या त्यांच्या घटकांनुसार दर्जा तपासण्याची जबाबदारी महामंडळाची आहे. त्यानुसार महामंडळाने औषधांचा दर्जा तपासावा. हाफकीनच्या विकासाची योजना तयार करण्यात यावी. यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे बैठकही आयोजित करण्यात येईल.
श्री. आबिटकर यांनी यावेळी सद्यस्थितीत औषध पुरवठ्यासाठी सुरू असलेल्या औषध खरेदीची आणि राज्य शासनाने नेमलेल्या डॉ. माशेलकर समितीनुसार कामकाज सुरू असल्याबाबतची माहिती घेतली.
०००
निलेश तायडे/विसंअ