मुंबई, दि. २३ : दरडप्रवण गावांच्या पूनर्वसनासाठीच्या अस्तित्वात असलेल्या धोरणात सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय मागवण्याच्या सूचना मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी दिल्या. याबाबत शासनाचे ऑक्टोबर २०२२ मध्ये धोरण ठरवण्यात आले आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या उपस्थितीत दरडप्रवण गावांचे पुनर्वसनाबाबत बैठक झाली. बैठकीस आपत्ती व्यवस्थापनचे संचालक सतीशकुमार खडके, सह सचिव संजय इंगळे, अवर सचिव प्रितमकुमार जावळे यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टी, पूर, भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधित तसेच आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन व नागरी सुविधा पुरविणे, पुनर्वसनासाठी पात्र लाभार्थ्यांचे निकष या धोरणात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच पुनर्वसित ठिकाणी १२ नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत धोरणात तरतूद करण्यात आली आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील म्हणाले की, या धोरणाची अंमलबजावणी करताना क्षेत्रीय स्तरावर काही समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी तज्ज्ञ आणि संबंधित विभागांच्या सल्ल्यानुसार, या धोरणात आणखी काही सुधारणा होऊ शकतात. त्यामुळे या धोरणात सुधारणा करणे व आणखी काही बाबींचा समावेश करणेबाबत क्षेत्रीय स्तरावरून सूचना घेणे आवश्यक आहे.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/