ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेद अभियान वचनबद्ध – मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर

महालक्ष्मी ट्रेड सरस मध्ये कोट्यावधींची उलाढाल

मुंबई, दि. 23 : ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू असलेल्या अनेक प्रयत्नांना यश येत आहे, उमेद अभियानांतर्गत स्थापित शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांच्या उत्पादकांना किंवा मालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी महालक्ष्मी ट्रेड सरस म्हणजेच खरेदीदार आणि विक्री करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्याचे संमेलन सिडको कन्व्हेन्शन सेंटर, वाशी येथे झाले.  या कार्यक्रमाचे उद्घाटन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) निलेश सागर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य परिचालन अधिकारी परमेश्वर राऊत, उपसंचालक संदीप जठार, अभियानाचे अवर सचिव  धनवंत माळी,  उपसंचालक  मनोज शेटे  यांच्यासह FDRVC चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन बिहारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी चे उपसचिव  उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश सागर म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस उपक्रम राबवले जात आहेत. त्यांच्या उत्पादनांच्या शुद्धता, गुणवत्ता आणि पारंपरिकतेला आम्ही प्राधान्य देत आहोत. तसेच, ई-कॉमर्सच्या माध्यमातून महिला उद्योजकता वाढवण्यासाठी नव्या संधी निर्माण केल्या जात आहेत.”

उमेद अभियानाच्या यशस्वी कामगिरीबाबत श्री. सागर म्हणाले, महाराष्ट्रात सध्या ४५० पेक्षा  जास्त  शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) सक्रिय आहेत. आतापर्यंत ५ लाख स्वयं सहाय्यता समूहांना जवळपास  १,००० कोटींचा समुदाय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. बँकांमार्फत ग्रामीण महिलांना ३०,००० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रात १९ लाख लखपती दीदी अभियानाने तयार केल्या आहेत असेही श्री.सागर यांनी सांगितले.

उमेद अभियानाचे नवे आयाम

अभियानाचे मुख्य परिचालन  अधिकारी श्री. परमेश्वर राऊत यांनी प्रास्ताविकात सांगितले, “उमेद अभियान हे फक्त ग्रामीण महिलांसाठी आर्थिक मदतीचे साधन नाही, तर त्यांना सन्मान देणारे आणि त्यांच्या कर्तृत्वाला वाव देणारे व्यासपीठ आहे. उमेद अभियानाचे उद्दिष्ट ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना जागतिक बाजारात पोहोचवणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आहे. या अभियानाद्वारे ग्रामीण महिलांचे यश भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी एक नवा आयाम ठरले आहे.

महालक्ष्मी ट्रेड सरस प्रचंड यशस्वी

राज्यस्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलन आयोजित करण्यात आले. तसेच राज्यभरात उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य वा थेट बाजारपेठ उपलब्ध होऊन योग्य नफा मिळावा ह्या उद्देशाने एक दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाला हार्वेस्ट प्लसचे, प्रोग्राम मॅनेजर स्वाधीन पटनाईक, ADM चे अमोल धवन,सलाम किसनचे अक्षय खोब्रागडे देहात कंपनीचे अनुराग पटेल असे एकूण विविध कंपनीचे २५ खरेदीदार व ७० महिला शेतकरी उत्पादक यांनी सहभाग नोंदवला. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतमालाची खरेदी विक्री करावी हा प्रमुख उद्देश होता. यामध्ये प्रामुख्याने तूर डाळ, चना डाळ, उडीद डाळ, नाचणी, कांदा, तांदूळ , मिरची, हळद यासारखे ३५ उत्पादनाचा समावेश करण्यात आला. या संमेलनात खरेदी-विक्री मधून दिवसभरात एकूण १.७० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. या संमेलनात झालेल्या वेगवेगळ्या करारांमधून आणि बोलणीतून भविष्यामध्ये ७ ते ८ कोटीची उलाढाल होणे अपेक्षित आहे. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राज्य अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/