जळगाव जिल्हा आरोग्य क्षेत्रात घेणार आघाडी- पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पोलीस कवायत मैदानावर संपन्न

▪️ चिंचोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ६५० खाटांचे रुग्णालय लवकरच सुरु होणार

️ जिल्ह्यातील ८ सिंचन प्रकल्पातून १ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ

 ️ सौर ऊर्जा निर्मितीतून जिल्हा होणार हरित ऊर्जायुक्त

 ️ महाआवास अभियानांतर्गत पात्रधारकांसाठी दीड लाख घरे

जळगाव दि. २६ ( जिमाका )  येत्या काळात जिल्हा आरोग्य सेवेचे केंद्र बनणार असून जळगाव शहराच्या जवळ चिंचोली येथे सर्व सुविंधायुक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ६५० खाटांचे रुग्णालय लवकरच सुरु होणार असून सिंचनाच्या दृष्टीनेही जिल्ह्यातील ८ प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर १ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले, याप्रसंगी पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी शुभेच्छा संदेश देताना सांगितले की, जळगाव जिल्हा आरोग्य सुविधाचे केंद्र बनत असून  जिल्ह्यातील सर्व सामान्यांच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन आणि एमआरआय सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.त्यामुळे शेकडो गरीब रुग्णांचा मोफत उपचार आधार बनतो आहे.

जिल्ह्यातील ८ सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जात असून, त्यातून १ लाख ९४ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगून जळगाव जिल्हा हरित ऊर्जायुक्त बनवण्यासाठी प्रधानमंत्री सौर ऊर्जा योजना व मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना राबविली जात आहे. यातून शेतकऱ्यांना सौर पंपासाठी अनुदान देऊन शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच महा आवास अभियानांतर्गत जिल्ह्यातील पात्रधारकांना दीड लाख घरे बांधून दिले जाणार असल्याचे सांगितले.

महिला सक्षमीकरणाबाबत बोलताना आपल्या संदेशात पालकमंत्री म्हणाले, राज्यात महिलांसाठी मोफत बससेवा योजना राबवण्यात येत असून, या योजनेतून जिल्ह्यात आतापर्यंत हजारो महिलांना लाभ घेतला आहे तसेच, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत जिल्ह्यात १० लाखांहून अधिक महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. मेहरूण येथे उभारले जात असलेले महिला व बाल कल्याण भवन लवकरच पूर्ण होणार आहे. महिलांना संकटसमयी तातडीने सहाय उपलब्ध व्हावे म्हणून जळगाव शहरात ‘ वन- स्टॉप सेंटर’ नव्याने बांधलेल्या इमारतीत सुरु करण्यात आले आहे.

स्वच्छ पिण्याचे पाणी जिल्ह्यातील नागरिकांना मिळावे यासाठी जल जीवन मिशन आणि अमृत 2.0 योजनेद्वारे जिल्ह्यातील गावांमध्ये स्वच्छ पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी सहज उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जिल्ह्यात ४ लाख १९ हजार शेतकरी लाभार्थी आहेत. तसेच, पीक विमा योजनेतून ३ लाख ८७ हजार शेतकऱ्यांना ६५६ कोटी रुपयांचे सहाय्य मिळाले असून केळी उत्पादकांसाठी राष्ट्रीय फळबाग विकास कार्यक्रमांतर्गत १०० कोटींच्या विशेष योजनेची अंमलबजावणी सुरू असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधोरेखित केले.

युवकांच्या कल्याणासाठी शासन करत असलेल्या कामाची माहिती देताना पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४,५८५ युवकांना रोजगार उपलब्ध झाला असून जळगावमध्ये आधुनिक विभागीय क्रीडा संकुल उभारले जात आहे. यामध्ये प्रशिक्षण सुविधा आणि मैदानांचा समावेश असेल, त्यामुळे तरुणांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल,यातून आंतरराष्ट्रीय क्रीडापटू तयार होतील अशी अपेक्षाही व्यक्त केली.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ६०७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, जिल्ह्याने निधी वितरणात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.तर आदिवासी उपयोजनाच्या निधी वितरणात जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक असल्याचे पालकमंत्र्यांनी नमुद केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी , “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या धोरणाच्या आधारे जळगाव जिल्हा आदर्श जिल्हा बनविण्याचा शासनाचा उद्देश आहे. भारतीय लोकशाहीचे ७५ वर्षांचे यश साजरे करताना जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पोलीस दल, होमगार्ड, अग्निशमन दल, राष्ट्रीय सेवा योजना, गाईडचे विद्यार्थी यांचे पोलीस बँडच्या धुनवर अत्यंत मनमोहक  पथ संचलन झाले.