अमली पदार्थ तस्करीप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली दि. 31 (जि. मा. का.) :  अमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा यावर अधिक लक्ष केंद्रित केले असून, याप्रकरणी पोलीस यंत्रणेने सतर्क राहावे. अमली पदार्थ तस्करी प्रकरणाची खोलवर चौकशी करून या प्रकरणाच्या मुळाशी जावे. अशा प्रकरणी पोलीस विभागाने कोणतीही हयगय व कोणाचीही गय करू नये. दोषींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

      जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पोलीस मुख्यालयातील सभागृहात  आयोजित या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, पोलीस उपायुक्त (गृह) दादासाहेब चुडाप्पा, मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा, सांगली शहर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी एम. विमला, इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन साळुंखे, तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अमली पदार्थांचे संकट आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकानेही याबाबत सदैव सजग राहिले पाहिजे. आपल्या मुलांचे भवितव्य सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, ही वृत्ती न ठेवता अशा प्रकरणी मिळालेली माहिती पोलीस दलाला वेळीच द्यावी. संबंधितांच्या नावाबाबत गुप्तता पाळली जाईल, असे ते म्हणाले.

      पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अमली पदार्थ दुष्परिणामाबाबत प्रबोधन व जनजागृती करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घ्यावा. पोलीस विभागाशी संपर्क साधून आपली याबाबतची संकल्पना स्पष्ट करावी. त्याचा सर्व खर्च जिल्हा नियोजन समिती किंवा सी एस आर मधून खर्च उचलला जाईल. मात्र नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही. पोलीस दलाने अशा प्रकरणी कोणतीही हयगय करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस दलासाठी सर्वसमावेशक आराखडा करण्याबाबत सूचित करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, यामध्ये पोलिसांसाठी कल्याण निधी, पोलिसांसाठी अद्ययावत संसाधने, पोलिसांना माहिती मिळण्याची व्यवस्था, खबऱ्यांना आर्थिक मदत देण्याची तरतूद आदि बाबींच्या अनुषंगाने आगामी काळात सर्वसमावेशक आराखडा करू. चांगले वागणाऱ्यांना वेळीच शाबासकी देऊ. पण, चुकीचे वागणाऱ्यांना शासन दिले पाहिजे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील यांनी आपल्या प्रत्येक भेटीत पोलीस विभागाच्या प्रत्येकी एका विभागाचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्याबाबत सूचित केले.

      या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेतली. अलीकडच्या कालावधीतील पोलीस विभागाच्या कामगिरीचा आढावा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सादर केला. विटा येथील 30 कोटी अमली पदार्थप्रकरणी पोलीस दलाच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त पालकमंत्री श्री. पाटील यांनी अभिनंदन केले. या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, हेड काँन्स्टेबल सागर टिंगरे व नाहेश खरात यांचे पोलीस दलाच्या वतीने प्रमाणपत्र व रोख रक्कम तसेच, वैयक्तिकरीत्या कॅडबरी देऊन कौतुक केले. प्रजासत्ताक दिनी जाहीर केल्याप्रमाणे संबंधितांचा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दहा हजार रूपये बक्षीस देऊन सन्मान केला जाईल, असे त्यांनी सांगितले.