नागरिकांनी दैनंदिन आहारात तृणधान्यांचा समावेश वाढविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार : कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे           

नाशिक, दि. 31 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा): तृणधान्यांमधील पोषणमूल्यांमुळे त्यांचे आहारातील आरोग्यविषयक महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे लक्षात घेऊन नागरिकांनी दैनंदिन आहारात तृणधान्यांचा समावेश वाढविणे आवश्यक आहे. तृणधान्याचे महत्त्व अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने तसेच जिल्हा व तालुकास्तरावर तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीन शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केले.

कृषी पणन मंडळाचे विभागीय कार्यालय नाशिक यांच्या मार्फत उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित ‘मिलेट महोत्सव-2025’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे चे सरव्यवस्थापक विनायक कोकरे ,कृषी पणन मंडळ  विभागीय कार्यालय नाशिकचे उपसरव्यवस्थापक एस.वाय. पुरी,  कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.डी.भाकरे, मिसेस इंडिया इंटरनॅशनल डॉ. शुभदा जगदाळे, प्राचार्य विलास देशमुख यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, आहारात पौष्टिक तृणधान्याची व्याप्ती वाढवून येणारी सदृढ पिढी निर्माण करण्यासाठी कृषी व पणन विभागाशी सलग्न सर्व विभागांना सर्वोतोपरी प्रयन्त करावे लागणार आहेत. देशातील 50 टक्के नागरिक हे शेती व्यवसायाशी संबंधित असून शेतीमध्ये अनेक आमुलाग्र बदल होतांना दिसत आहेत. शेतीतील नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून नवीन विकसित वाण, पीकपद्धती विकसित होत आहेत. या शेती उत्पादितांना त्यांच्या गाव, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी  विक्री व्यवस्था व बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पणन मंत्री यांच्यासमवेत चर्चा करून शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री  ॲड. कोकाटे यांनी सांगितले.  तसेच मिलेट महोत्सवासोबत जी कृषी प्रदर्शने जिल्ह्यासोबतच तालुका व गाव पातळीवर व्हावीत. तसेच या प्रदर्शनांची नागरिकांमध्ये माहिती होण्यासाठी जनजागृती करावी, असेही त्यांनी  सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते फित कापून तीन दिवसीय ‘मिलेट महोत्सव-2025’ उद्घाटन झाले. यावेळी महर्षि उदाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास त्यांनी माल्यार्पण केले. तत्पूर्वी कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी तृणधान्य महोत्सवाच्या निमित्ताने तृणधान्यांपासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेट देत स्टॉल धारकांशी संवाद साधला. यावेळी उपसरव्यवस्थापक श्री. पुरी व प्राचार्य डॉ.भाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित  ‘मिलेट महोत्सव-2025’  2 फेब्रुवारी 2025 पर्यंत नागरिकांसाठी सुरू असणार आहे. या ठिकाणी तृणधान्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांचे 30 स्टॉल उभारण्यात आलेले आहे. यात नाशिकसह, सोलापूर, जळगाव, सातारा, नांदेड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, पुणे जिल्हृयातील समूह सहभागी झाले आहेत. ग्राहकांना ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर ही तृणधान्ये व यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ तसेच ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, भाकरवडी, शेवया, नुडल्स, आईस्क्रिम, खाकरे, शेव, चिवडा,  रागीचा डोसा मिक्स इत्यादी नाविण्यपूर्ण अशी उत्पादने थेट उत्पादकांकडून प्रदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. याबरोबरच मिलेट उत्पादन ,मूल्यवर्धित प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्व या विषयी नामांकित तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चासत्र, प्रश्नमंजुषा, अनुभव कथन  असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.