बचतगटांच्या माध्यमातून साकारतोय महिलांचा शाश्वत विकास – पालकमंत्री संजय राठोड

समृद्धी सरस प्रदर्शन व विक्रीचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; प्रदर्शनीत महिला बचतगटांद्वारे उत्पादित वस्तुंची विक्री दालने

यवतमाळ, दि.1 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदने महिलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला. उमेद तसेच विविध यंत्रणांद्वारे निर्माण केल्या गेलेल्या हजारो बचतगटांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांचा शाश्वत विकास साकारल्या जात आहे. महिला उद्योजक म्हणून पुढे येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने उमेद अभियानांतर्गत समता मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय समृद्धी मिनी सरस प्रदर्शन व विक्रीचे पालकमंत्र्यांच्याहस्ते आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अतुल इंगळे, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात उमेद अंतर्गत 2 लाख 56 हजारावर स्वयं सहायता समूह तयार झाले आहे. 2 लाख 62 हजारावर कुटुंब या समुहांशी जोडल्या गेलेले आहे. ही खरं तर आनंदाची गोष्ट आहे. जितक्या जास्त महिला गटांशी जोडल्या जातील, तितके कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. गेल्या काही वर्षात गटांनी अनेक नवीन प्रयोग केले. अनेक गटांचे उद्योजक होण्याचे स्वप्न उमेद अभियानामुळे साकार झाले, असे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, खनिज विकास योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. प्रभाग संघ, ग्रामसंघांना आपण सक्षम करतो आहे. गटाच्या महिलांना वेगळे नाविण्यपुर्ण उपक्रम करण्याच्या कल्पना असतील तर सांगा त्यासाठी देखील निधी उपलब्ध करून देऊ. जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 24 महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहे. ही देखील जिल्ह्यासाठी आनंदाची बाब असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना श्री.पत्की यांनी महिलांच्या आर्थिक, सामाजिक सक्षमीकरणासाठी उमेद अभियान राबविले जात आहे. महिलांच्या हातात पैसा आला पाहिजे, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे, हा अभियानाचा उद्देश असल्याचे सांगितले. प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी उमेदच्या जिल्ह्याच्या कामाची माहिती व प्रगती सादर केली.

प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांनी बचतगटांच्या स्टॅालची पाहणी केली. प्रदर्शनीत गटांचे 75 स्टॅाल लावण्यात आले असून त्यात गटाने उत्पादीत केलेल्या विविध वस्तु, कलाकुसर, खाद्य पदार्थ आदींचा समावेश आहे. प्रदर्शन दि.5 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहे. रोज सायंकाळी नामवंत कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहे. कार्यक्रमास उमेदचे जिल्हा व्यवस्थापक स्नेहा खडसे, सागर वानखडे, जितेंद्र मेश्राम, प्रीतम हस्ते यांच्यासह बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचनल मृणालिनी दहीकर यांनी केले तर आभार स्नेहा खडसे यांनी मानले.