पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी केली चर्चा
अमरावती : खरीप हंगाम सुरु झालेला असतानाही जिल्ह्यात खरीप कर्जपुरवठ्यासाठी गती घेतली नाही. याबाबत नाराजी व्यक्त करत पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी कर्जवितरण वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन व तालुका समित्यांनी रोज पाठपुरावा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
शेतकरी बांधवांना वेळेत कर्जपुरवठा होण्यासाठी बँकांबाबत कडक धोरण अंमलात आणण्याची विनंतीही पालकमंत्र्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे दूरध्वनीवरून चर्चा करताना केली. कोरोना संकटामुळे सध्या सर्वच क्षेत्रांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जगाचा पोशिंदा मानल्या जाणाऱ्या शेतकरी बांधवापुढेही अनेक संकटे उभी आहेत. त्यामुळे खरीप हंगामात पतपुरवठा वेळेत झाला पाहिजे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी वेळोवेळी दिले आहेत. बँकांकडून अद्यापही कर्ज वितरणाला गती मिळालेली नाही. याबाबत कडक धोरण आणण्याबाबतत त्यांनी वित्तमंत्री श्री. पवार यांच्याकडे दूरध्वनीवरून विनंतीही केली.
तालुका समित्यांनी पाठपुरावा करावा
खरीप हंगामात कर्ज मागण्यासाठी येणाऱ्या शेतकरी बांधवांची बँकांनी अडवणूक करू नये. यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुका समित्या स्थापण्यात आल्या आहेत. या समित्यांनी प्रभावीपणे देखरेख, पाठपुरावा केला पाहिजे. कुणीही पात्र शेतकरी बांधव कर्जपुरवठ्यापासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
कोरोना संकटकाळात व इतर नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी बांधव आधीच अडचणीत असताना बँकांनीही आपली जबाबदारी संवेदनशीलपणे काम करणे अपेक्षित आहे. आपण आता जून महिन्याच्या मध्यावर आहोत. बी-बियाणे, खते आदी कृषी निविष्ठांसाठी शेतकऱ्याला खरीप कर्जाची मोठी मदत होत असते. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वेळेत कर्ज मिळालेच पाहिजे. शेतकरी बांधवांना संपूर्ण सहकार्य केले पाहिजे. कर्जवितरणाच्या नियोजनानुसार उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे. कुणीही अनास्था दाखवून कारवाई करण्यास भाग पाडू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
जूनचे दोन आठवडे उलटले तरी अद्याप १२ ते १४ टक्केच कर्जवितरण झाल्याचे दिसते. खरीप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेप्रमाणे सर्व राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांनीही सहकार्याची भूमिका ठेवावी. जिल्हा उपनिबंधक व अग्रणी बँकेनेही समन्वय ठेऊन वेळोवेळी कर्जपुरवठ्याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
खरीप कर्जापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये यासाठी सर्व बँकांनी नियोजनानुसार वेळापत्रक तयार करून त्याचे पालन करावे. हवामान खात्याने यंदा चांगल्या पर्जन्याची शक्यता वर्तवली आहे. याकाळात पेरणी, शेतीला खत व इतर मशागत वेळेत होण्यासाठी तत्काळ पतपुरवठा होणे गरजेचे आहे. त्यासाठी बँक प्रमुखांनी आपल्या सर्व शाखांना तसे निर्देश द्यावे व वेळेत कार्यवाही व्हावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.