मुंबई, दि. ३ : मुंबई भेटीवर आलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी (दि. २) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. आपल्या औपचारिक भेटीनंतर एडवर्ड यांनी राजभवनातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा वास्तूंना भेट दिली.
राणी एलिझाबेथ द्वितीय व ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे सर्वात धाकटे सुपुत्र तसेच राजे चार्ल्स तृतीय यांचे धाकटे बंधू असलेल्या प्रिन्स एडवर्ड यांनी सुरुवातीला राजभवनातील पूर्वी जमिनीखाली तोपखाना असलेल्या हिरवळीची पाहणी केली.
याच हिरवळीवर एडवर्ड यांचे ज्येष्ठ बंधू प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स यांच्या सन्मानार्थ सन १९८० मध्ये चहापान झाले होते.
त्यानंतर एडवर्ड यांनी ‘जल लक्षण’ या राष्ट्रपती व पंतप्रधान यांचेसाठी राखीव असलेल्या अतिथिगृहाला भेट दिली. या अतिथीगृहात सन १९६१ मध्ये राणी एलिझाबेथ व त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचा राष्ट्रीय अतिथी या नात्याने मुक्काम होता.
राज्यपालांचे सचिव प्रविण दराडे व जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी त्यानंतर एडवर्ड यांना ‘जल किरण’ अतिथीगृह, ‘जल विहार’ हे ऐतिहासिक सभागृह तसेच ब्रिटिश कालीन बंकर दाखवले.
यावेळी ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांग, ड्यूक यांचे खासगी सचिव अॅलेक्स पॉट्स आणि राजकीय व द्विपक्षीय व्यवहार विभागप्रमुख जॉन निकेल हे देखील उपस्थित होते.
राजभवनातील अधिकाऱ्यांचे आभार मानून प्रिन्स एडवर्ड पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
स्वातंत्र्यपूर्व काळात राजभवन येथे असलेले ‘गव्हर्मेंट हाऊस’ स्वातंत्र्यानंतर मुंबई राज्याचे व राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्राचे राजभवन झाले.
0000