महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा आवाज निमाला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. ६ :- महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा व मिरवणारा आवाज या खेळातील संज्ञेप्रमाणेच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे आज निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतात, महाराष्ट्राचे क्रिकेट प्रेम सर्वश्रृत आहे. पण या प्रेमाची जगभर ख्याती मिरवण्याची किमया संझगिरी यांनी साधली. क्रिकेट सामन्यांचे ओघवत्या शैलीतील त्यांच्या वृत्तांकनांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांचे क्रिकेट समीक्षण रसरशीत आणि तितकेच रोमांचक असे. क्रिकेट शिवाय नाटक, चित्रपटांचे लेखन यांसह अनेकविध क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. क्रिकेट या खेळावर त्यांनी अखेरपर्यंत निस्सीम प्रेम केले. त्यांच्या निधनाने एक उत्कट क्रीडाप्रेमी, क्रिकेट विषयीच्या लेखन-समीक्षणाने मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचे चाहते, कुटुंबियांच्या आम्ही दुःखात सहभागी आहोत, असे नमूद करून, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0000