मुंबई, दि. ६ : क्रीडा समीक्षणात साहित्यविश्वाचे सौंदर्य ओतून आपल्या ओघवत्या कथनशैलीमुळे क्रीडाक्षेत्राची आवड मनामनांत पेरणारे प्रसिद्ध समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे मराठीच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
आपल्या शोक संदेशात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, द्वारकानाथ संझगिरी हे साक्षेपी साहित्यिक, पत्रकार, स्तंभलेखक आणि चित्रवाणी कार्यक्रमांचे निर्माते अशा विविध क्षेत्रांत ठसा उमटविणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने एका मिश्किल आणि खुमासदार शैलीच्या क्रीडा पत्रकाराला महाराष्ट्र मुकला आहे.
उत्कृष्ट पत्रकारिता, लेखनशैली, समीक्षा अशा अनेक गुणांनी संपन्न असलेल्या संझगिरी यांनी मराठी, इंग्रजी आदी भाषांतील लेखनातून वाचकांशी साधलेल्या संवादाचा धागा तुटला आहे. त्यांच्या असंख्य पुस्तकांनी मराठी वाचकांना आनंद दिला आणि त्यांचे अनुभवविश्व समृद्ध केले. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
००००