गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची – मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. 6 : राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी या व्यवसायामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची आहे. त्या दृष्टीने राज्याचे  मत्स्य धोरण तयार करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मंत्रालयात आज राज्यातील तलाव ठेक्यांचा आढावा घेण्यासाठी मंत्री श्री. राणे यांच्या उपस्थितीत बैठक  झाली. त्यावेळी ते बोलत होते.

तलावांच्या ठेके वाटपात शिस्त आणण्याच्या सूचना देऊन मंत्री श्री. राणे म्हणाले की, ग्रामीण भागातील अर्थकारणास चालना देणे आणि ग्रामीण जनतेचे उत्पन्न वाढवणे हा तलावांचे ठेके देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या संस्थांचा आर्थिक विकास होण्यासाठी मत्स्य उत्पादन वाढ महत्वाची आहे. यासाठी निविदा पद्धतीने ठेके वाटप झाले पाहिजे. या सर्व व्यवसायावर एक नियंत्रण हवे. त्यासाठी काही प्रमाणात शुल्क आकारण्यात यावे. राज्यात मत्स्य उत्पादन वाढीसाठी मोठी संधी आहे. मासेमारी हा राज्यातील एक मोठा व्यवसाय आहे. यासाठी तलाव ठेक्यांची संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीवर आणावी. या प्रणालीमध्ये सर्व माहिती उपलब्ध असावी. त्यामध्ये ठेका कोणत्या संस्थेला दिला. कधी दिला. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तलाव आहेत. याची सर्व माहिती असावी, अशा सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

मंत्री श्री. राणे म्हणाले की, राज्यात कोणकोणत्या संस्थांना कधी ठेके दिले आहेत. त्यांनी त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले आहे का? कधी केले आहे? नूतनीकरण नियमितपणे झाले आहे का? या विषयी सविस्तर माहिती पुढील आठवड्यात सादर करावी. विभागाने मत्स्य व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय उद्योग विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम, मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान मंत्री श्री. राणे यांनी रेडी बंदर विषयी आढावा घेतला. रेडी बंदर रेल्वे आणि चारपदरी महामार्ग याने जोडले जाणार आहे. त्यामुळे या बंदराच्या विकासास गती मिळणार असल्याचे मंत्री श्री. राणे म्हणाले. तसेच या बंदर बाबत फेमेंतो कंपनीस येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी सागरी महामंडळाने सहकार्य करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीस महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीप, कॅप्टन प्रवीण खारा, संजय उगुलमुगले, महामंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, फेमेंतो कंपनीचे कॅप्टन करकरे आणि उन्मेष चव्हाण उपस्थित होते.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/