नांदेड, दि. 6 फेब्रुवारी : महामार्ग हे विकासाचे ‘गेमचेंजर ‘म्हणून सिद्ध होतात. समृद्धी महामार्गाने हे सिद्ध केले आहे. सुरुवातीला समृद्धी महामार्गाला विरोध होता. समृद्धी सारखाच या शक्तीपीठ महामार्गाचा विरोध देखील हळूहळू मावळेल, असा आशावाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमध्ये व्यक्त केला.
एकनाथ शिंदे एक दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर आले होते. दिवसभरात त्यांचे विविध कार्यक्रम होते. दुपारी गुरुगोविंद सिंघजी नांदेड विमानतळावर आगमनानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी नांदेड येथील पवित्र श्री हुजूर साहिब सचखंड गुरूद्वारा येथे भेट देऊन दर्शन घेतले. दुपारी त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.
सायंकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शक्तिपीठ महामार्गाचा विरोध ओसरेल असे स्पष्ट केले. ते म्हणाले समृद्धी किंवा शक्तिपीठ सारखे महामार्ग केवळ दळणवळणाची व्यवस्था नाही तर या भागातील कृषीवर आधारित अर्थव्यवस्थेला गती देणारे नवीन मॉडेल आहे.
शक्तिपीठ महामार्गाचे महत्व कळल्यावर. भविष्यातील दळणवळणाचे व विकासाचे महत्त्व पटल्यानंतर, विरोध मावळतो. शक्तिपीठ महामार्ग कुठेही जनतेवर लादणार नाही, असे सांगताना जिथे विरोध आहे तिथे काम केले जाणार नाही. त्याठिकाणी रस्त्याची अलाइनमेंट बदलली जाईल. त्याचवेळी त्या-त्या भागाची कनेक्टिव्हिटीही महत्त्वाची आहे.
समृद्धी महामार्गाला प्रारंभी विरोध होता; मात्र त्याची उपयुक्तता सिद्ध होताच विरोध मावळला आहे. अशीच परिस्थिती शक्तिपीठ महामार्गाची असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सर्वांनी या मोठ्या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कोणत्याच योजना बंद होणार नाही
राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो वा राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत, तसेच यापूर्वीच्या कोणत्याही चांगल्या योजना बंद होणार नाहीत, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. उलट मराठवाड्याची दुष्काळवाडा अशी असलेली ओळख दूर करण्यासाठी बंद पडलेल्या योजना महायुती सरकार पुन्हा सुरू करीत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बंद पडलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार योजना, पुन्हा सुरू करून मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न दूर करण्यात येईल. मराठवाड्यासाठी 11 जलसिंचन योजनांना मंजुरी दिल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार आनंद पाटील बोंढारकर, आमदार संतोष बांगर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
0000