विदर्भ भूदान यज्ञ मंडळाच्या नवीन कार्यकारीणीचा प्रस्ताव सादर करावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

भुदानातील संपूर्ण जमिनींचे जिओ टॅगिंग करणार; शर्तभंग झालेल्या जमिनी मंडळाकडे जमा करणार

मुंबई, दि. ६ :  विदर्भ भूदान यज्ञ मंडळाच्या नवीन कार्यकारिणीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या असून, मंडळाचे कामकाज आदर्शवत व्हावे यासाठी काही निर्णय घेण्याच्या सूचनाही महसूल अधिकारी तसेच विदर्भ भूदान यज्ञ मंडळातील कार्यकर्त्यांना त्यांनी दिल्या.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली या अनुषंगाने मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत भूदान मंडळ, कामकाज व सध्याची स्थिती यावर चर्चा झाली. महाराष्ट्रातील भूदान मंडळाच्या जमिनींबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. विदर्भात अशी एकूण १७,२८० हेक्टर जमीन असून यापैकी १४,८६० हेक्टर जमिनीचे वाटप झाले आहे तर २,४३७ हेक्टर जमिनीचे वाटप शिल्लक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

ज्या जमिनींचे वाटप अद्याप झालेले नाही त्यांचे वाटप तातडीने करण्याची सूचना महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी केली. त्याचबरोबर वाटप झालेल्या तसेच वाटप न झालेल्या जमिनींची सद्यस्थिती याबाबतची माहिती घेऊन संपूर्ण जमिनींचे जिओ टॅगिंग करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. वाटप झालेल्या जमिनींमध्ये शर्तभंग झाल्यास अशा जमिनी भूदान यज्ञ मंडळाकडे जमा करण्याची सूचनाही त्यांनी केली.

बैठकीला विदर्भ सर्वसेवा संघाचे अध्यक्ष अरविंद रेड्डी, समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे, भय्या गिरी, अमर वाघ, मीथिलेश ढवळे, संदीप सराफ आदी उपस्थित होते.

०००

बी.सी.झंवर/विसंअ