तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा- पालकमंत्री जयकुमार रावल

नाशिक विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे शानदार समारंभात उद्धाटन संपन्न

धुळे, दि. ७ (जिमाका) : प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा, जेणेकरुन आपला दिवस चांगला जाऊन कार्यालयातही गतीमान प्रशासनास मदत होईल. असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

नाशिक विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२५ चा उद्धाटन समारंभ सोहळा पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते आज जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथे संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार मंजुळाताई गावित, राघवेंद्र पाटील, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर (धुळे), आयुष प्रसाद (जळगाव), मित्ताली सेठी (नंदूरबार), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अर्जुन पुरस्कार विजेती ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण (मालेगाव), धनंजय गोगटे (नंदूरबार), अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत पवार यांच्यासह नाशिक विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, नाशिक विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे यजमानपद धुळे जिल्हयास दहा वर्षानंतर मिळाले आहे. त्यामुळे अत्यंत आनंदी व उत्साहाचं वातावरण या कार्यक्रमामध्ये दिसून येत आहे. धुळे जिल्ह्यात सतत वेगवेगळया स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. महासंस्कृती महोत्सव नंतर धुळे मॅरेथॉन स्पर्धां झाली. या स्पर्धेत राज्यातील व जिल्ह्यातील ३१ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. आणि त्यानंतर आज हा कार्यक्रम होत आहे. आपला देश आर्थिक महासत्ता बनत असतानाच अनेक नागरीक उच्च रक्तदाब, डायबिटीस अशा आजारांनी त्रस्त होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नाशिक विभागीय महसुल क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळा आनंद आपणास मिळणार आहे. तणावमुक्त जीवनासाठी अशा स्पर्धा खुप महत्त्वाच्या आहे. देशात २०३६ मध्ये ऑलम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धंत जास्तीत जास्त सुवर्ण पदक कसे मिळतील. यादृष्टीने सर्वानी प्रयत्न करावे. तसेच या तीन दिवसांत हसत, खेळत तणावमुक्त होवून येणाऱ्या काळात गतीमान प्रशासनासाठी या स्पर्धेची नक्कीच मदत होईल, असा विश्वासही पालकमंत्री श्री. रावल यांनी यावेळी व्यक्त केला.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कामही वाढले आहे त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड तणाव असतो. अशा क्रीडा स्पर्धेमुळे त्यांच्यातील तणाव दूर करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या तीन दिवशीय स्पर्धेत सर्वांनी सहभागी घेवुन या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यावा, खेळात जय, पराजय होतच असतात. परंतु प्रत्येकाने खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले की, नाशिक विभागीय महसुल क्रीडा स्पर्धेत प्रत्येक खेळाडूचा वर्षभरात केलेल्या तयारीचा या क्रीडा स्पर्धेत कस लागतो. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक विभागाची एक चांगल्या टिमची निवड होणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने आपली चांगले कसब दाखवुन क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करावी. तसेच महसुल कर्मचाऱ्यांच्या कलागुणाना वाव देण्यासाठी सांयकाळी ७ ते रात्री १० दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे याचाही सर्वांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेती ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन सर्व खेळाडू यांना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. यावेळी अहिल्यानगर, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक, जळगाव, नंदुरबार, नाशिक, धुळे या नाशिक विभागातील जिल्ह्यांच्या खेळाडूंनी उत्कृष्ठ पथसंचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कविता राऊत यांनी खेळाडूंना शपथ दिली. मान्यवरांच्या हस्ते हवेत रंगीबेरंगी फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाट करण्यात आले.

यावेळी १०० मीटर धावण्याच्या स्पर्धां मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. या स्पर्धेत पुरुष गटात अहिल्यानगर येथील महेश निकम यांना प्रथम क्रमाक, नाशिक द्वितीय क्रमांक बालकृष्ण कुमार, तर तृतीय क्रमांक अहिल्यानगर अनिल पठारे, यांना तर महीला संघात प्रथम क्रमांक धुळे येथील पुनम चौरे, द्वितीय क्रमांक नाशिक वैशाली सहारे, तर तृतीय क्रमांक अहिल्यानगर  रुपाली बडे या जिल्ह्यास पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, पुनम बेडसे यांनी केले तर आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावडे यांनी केले. यावेळी नाशिक विभागातील ६५० पेक्षा जास्त खेळाडू, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000