नागपूर,दि. 7 : विदर्भात मोठ्या प्रमाणात तलाव असून या तलावाच्या माध्यमातून मत्स्य उत्पादनाला मोठ्या प्रामाणात वाव आहे. येथील मत्स्य उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यासोबतच गोड्या पाण्यातील मत्स्यउत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची ग्वाही मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात नागपूर विभागातील मत्स्यउत्पादनाला प्रोत्साहन तसेच मत्स्यव्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत नितेश राणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे, सहायक आयुक्त शुभम कोमरेवार तसेच जलसंधारण, पाटबंधारे विभागाचे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नागपूर विभागात माजी मालगुजारी तलाव व इतर तलाव मोठ्या प्रमाणात आहेत. या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादन घेणे शक्य असून या तलावाच्या दुरुस्ती व देखभालीसाठी संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्यात.
मत्स्यव्यवसायकिांना येणाऱ्या अडचणी संदर्भात बोलतांना श्री.राणे म्हणाले की, मासेमारी तलाव गाळमुक्त तलाव-जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुरुस्त करण्याला प्राध्यान्य देऊन चांगल्या प्रतीचे मत्स्यबीज उपलब्ध करुन देण्यात यावेत. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या जलसंठयांमध्ये मत्स्यव्यवयासाला प्रोत्साहन दिल्यास येथील मत्स्यव्यवसायिकांना मोठया प्रमाणात लाभ होईल. यासाठी उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित करा, असे त्यांनी सांगितले.
जलसंपत्तीचा वापर करुन मच्छिमारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्या. मच्छिमार सामाजिक व आर्थिक द्ष्टया मागासलेला आहे. त्यांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्या. विभागाचा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करुन निधी उपलब्ध करण्यात येईल. मत्स्यपालकांची गैरसोय होणार नाही याकडे प्राधान्याने लक्ष द्या. ग्रोथ व यशकथा तयार करा, असे त्यांनी सांगितले.
शहरात मच्छिमाराच्या उत्पादन विक्रीसाठी मासळी बाजारपेठ उभारा. त्यामुळे त्यांच्या उत्पनात भर होईल. विभागाचा तिमाही ॲक्शन प्लॉन तयार करा. मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. सोबतच आंध्र प्रदेश दौऱ्यावर अभ्यासगट जाणार आहे. त्यात आपणास सहभागी करण्यात येईल. यामुळे नाविण्यपूर्ण प्रयोग करता येईल.
प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे यांनी राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यात निलक्रांती योजना, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना, राष्टीय कृषी विकास योजना, मासळी बाजारपेठ उभारणी, किसान क्रेडिटकार्ड योजना, ई-श्रम कार्ड योजना, एनएफडीपी पोर्टल रजिस्ट्रेशन, प्रधानमंत्री सूरक्षा विमा योजना, शासकीय मत्स्यबिज केंद्र विक्री यांचा समावेश आहे.
मत्स्य विज्ञान महाविद्यालयास भेट
मत्स्य विज्ञान महाविद्यालय येथे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली. मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत तेलवेकर यांनी त्यांचे स्वागत केले. विद्यापीठाच्या कुलसचिव मोना ठाकूर, उपकुलसचिव अजय गावंडे, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे, सह आयुक्त शुभम कोमारेवर या प्रसंगी उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी महाविद्यालयातील मत्स्य अभियांत्रिकी, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान आणि मत्स्य विस्तार विभागांना भेट देऊन महाविद्यालाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार कार्याचा आढावा घेतला. महाविद्यालयाने विकसित केलेल्या फिरता मत्स्य विक्री संच तसेच माशांचे धुरीकरण संयंत्र या तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली. महाविद्यालय करीत असलेल्या शैक्षणिक आणि विस्तार कार्याची प्रशंसा त्यांनी यावेळी केली. सोबतच महाविद्यालयाचे इमारतीचे बांधकाम, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह या बाबतचे प्रस्ताव शासनास सादर करावेत, असे ते म्हणाले.
महाविद्यालयाने मत्स्य व्यवसाय विभागात सोबत कृती आराखडा आणि मत्स्य कास्तकारांसाठी विकास प्रकल्प शासनास सादर करावेत, असेही निर्देश त्यांनी दिले. या नंतर विद्यापीठाच्या माफसू संग्रहालयाला भेट दिली आणि तेथील सादरीकरणाची पाहणी केली. संग्रहालयातील पशु संवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय प्रतिकृतीं तसेच दर्शवलेली माहिती याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.