मुंबई, दि. 8 :- “मुंबईतील गिरणगावात वाढलेले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिसस्पर्श लाभलेले ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत महाराष्ट्राच्या गेल्या पाऊण शतकाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी ही त्यांची ओळख होती. शिवसेनेचे मुखपत्र ‘मार्मिक’चं कार्यकारी संपादकपद प्रदीर्घकाळ भूषवताना मराठी माणसाचे हक्क, मराठी अस्मितेचे रक्षण, महाराष्ट्राच्या हितरक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलं. लालबाग, परळ भागातल्या वास्तव्यामुळे मुंबईतील कामगार चळवळीबद्दल त्यांना विशेष आस्था होती. शिवसेनेचा आणि कामगार चळवळीचा उत्कर्षाचा काळ त्यांनी जवळून अनुभवला होता. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी सर्वस्पर्शी विपुल लेखन केलं. त्यांनी केलेले वार्तांकन, लिहिलेले लेख, पुस्तके ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा, समृद्ध जडणघडणीचा मोलाचा दस्तावेज आहेत. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली होती. आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. स्वर्गीय बाळासाहेबांचा विश्वासू शिलेदार आपण आज गमावला आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाने शिवसेनाप्रमुखांचा विश्वासू सहकारी गमावला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक वाटचालीचा गेल्या पाऊण शतकाचा प्रत्यक्ष साक्षीदार हरपला