नाशिक, दि.8 फेब्रुवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा): मूलभूत सेवा-सुविधांची कामे गुणवत्तापूर्वक होण्यासाठी नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
आज दिंडोरी तालुक्यातील चौसाळे येथे 450 कोटींच्या निधीतून कोशिंबे मुलविहिर प्रजिमा -40 साखळी क्रमांक 19/500 वर उनंदा नदीवरील मोठ्या पुलाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अभिजित कांबळे, सरपंच ज्योती डंबाळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले की, रस्ते, वीज व पाणी या संदर्भातील होणाऱ्या विविध विकास कामांमध्ये नागरिकांनी आपले काम अशी भावना ठेऊन प्रत्यक्ष सहभागी झाल्यास कामे अधिक दर्जात्मक होतील. येणाऱ्या काळात पाणी, शिवार रस्त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. असल्याचे मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थ होणारी भेसळ रोखण्यासाठी 40 अन्नपदार्थ तपासणी व्हॅन कार्यान्वित होणार असून या अन्न नमुनेचे तपासणी अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी विभाग स्तरावर सहा प्रयोगशाळा स्थापित होणार आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत प्रबोधनकार व कीर्तनकार त्यांच्या माध्यमातून अन्नपदार्थ भेसळ बाबत नागरिकांसाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री झिरवाळ यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री.झिरवाळ यांच्या हस्ते कृषीभूषण विजेते सम्राट राऊत, राज्यस्तरीय पीक स्पर्धा विजेते नारायण तुंगार व शासकीय वसतगृहातील पोलिस दलात निवड झालेल्या गणेश राऊत या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.