सातारा, दि. 8: महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. हा विभाग आपत्ती पासून ते निवडणुका पार पाडण्याबरोबर शासनाच्या विविध महत्वकांक्षी योजना प्रभावीपणे राबवित असतो. वाढत्या कामांमुळे अतिरिक्त ताण व तणाव शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर असतो. ताण-तणाव कमी करण्यासाठी दररोज शारिरीक व्यायाम महत्वाचा आहे, त्या दृष्टीने या क्रीडा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन सार्वजकनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले
येथील पोलीस परेड ग्राऊंड येथे पुणे महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दि. 8 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते.
![kkk 10 - महासंवाद](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2025/02/kkk-10-scaled.jpg)
सातारा येथे होणारी हिल मॅरेथॉन स्पर्धा देशासह जगात प्रसिद्ध आहे. शारिरीक व्यायामामुळे मानसिक ताण कमी होतो. त्यामुळे स्वत:साठी एक तास काढून व्यायाम करा. पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सांस्कृतिक कार्यक्रमही होणार असून यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना संधी उपलब्ध होणार आहे. तीन दिवस होणाऱ्या या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असेही आवाहनही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी केले.
महसूल विभागाशी प्रत्येक नागरिकाचा कोणत्या ना कोणत्या कारणाने संबंध येतो, असे सांगून मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील म्हणाले, आपत्ती, रस्ते, धरण बांधणे ते लोकसभा निवडणुकीपासून ते ग्रामपंचायत निवडणुकां सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी महसूल विभागावर असते. अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाचा अधिकचा ताण आहे. पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या माध्यमातून ताण तणाव कमी होईल. ह्या स्पर्धा निकोप पद्धतीने पार पडतील. नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय महसूल स्पर्धेत पुणे विभाग अव्वल राहील, असा विश्वासही मदत व मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला.
![kkk 5 - महासंवाद](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2025/02/kkk-5-scaled.jpg)
विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, शासनाचे प्रतिनिधीत्व करणारा महसूल विभाग आहे. ताण-तणावमुक्त करण्याबरोबर आरोग्य चांगले ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धांना अनन्यसाधारण महत्व आहे. शरीर सुदृढ असल्यास कोणत्याही ताण-तणावाला सहज सामोरे जाता येते. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दररोज वेळ काढून विविध खेळ खेळले पाहिजेत. पुणे महसूल विभाग आपले कुटुंब आहे. स्पर्धेत खिलाडू वृत्तीने सहभाग घ्यावा. नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत एकीने यश संपादन करुया, असे आवाहन ही त्यांनी केले.
स्पर्धा आयोजित करण्याचे यजमानपद सातारा जिल्ह्याला मिळाले याचा आनंद आहे. पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत क्रिकेट, कबड्डी, धावणे यासह विविध क्रीडा स्पर्धांसह सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धंकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी केले.
पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.