सुरक्षित इंटरनेट दिन दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात साजरा केला जातो. यंदा हा दिवस उद्या, मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी 2025 रोजी ‘Together for a Better Internet’ या थीमखाली साजरा होत आहे. लहान मुले आणि तरुणांमध्ये इंटरनेटच्या सुरक्षित व जबाबदार वापराविषयी जागरूकता वाढवणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.
आजच्या काळात शासकीय कामात सायबर सुरक्षेचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) आणि जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांनी ‘Secure Your Accounts’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सरकारी कार्यालय, बँक, खाजगी संस्था आणि नागरिक यांना त्यांच्या ऑनलाईन खात्यांच्या सुरक्षेबद्दल माहिती दिली जाईल.
सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाच्या बाबी:
- इंटरनेट सुरक्षा: फक्त विश्वसनीय वेबसाईट वापरा. HTTPS असलेली वेबसाइट वापरा. सार्वजनिक वाय-फाय वापरताना VPN चा वापर करा आणि तुमचे सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा.
- पासवर्ड सुरक्षा: मजबूत पासवर्ड ठेवा. प्रत्येक खात्यासाठी वेगळा पासवर्ड वापरा. नियमितपणे पासवर्ड बदला आणि Two-Factor Authentication (2FA) चा वापर करा.
- बँक खात्यांची सुरक्षा: OTP, PIN, CVV कोणालाही देऊ नका. फिशिंग ई-मेल आणि बनावट कॉल्सपासून सावध राहा. बँकेच्या ऑफिशियल ॲपमधूनच व्यवहार करा आणि मोबाईल वॉलेट व नेट बँकिंगसाठी मजबूत पासवर्ड ठेवा.
- UPI पेमेंट सुरक्षा: अनोळखी व्यक्तीकडून आलेली UPI पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारू नका. UPI PIN फक्त पैसे पाठवण्यासाठी असतो, घेण्यासाठी नाही, फसव्या कॉल्सला प्रतिसाद देऊ नका आणि Google Pay, PhonePe, Paytm इत्यादी ॲप्सवर सुरक्षा सेटिंग चालू ठेवा.
- सोशल मीडिया सुरक्षा: तुमची खासगी माहिती सार्वजनिक करू नका. मजबूत पासवर्ड ठेवा आणि 2FA सुरू करा. खोट्या ऑफर्स आणि लिंक्स टाळा आणि Facebook, Instagram, X (Twitter) वर लॉगिन अलर्ट सुरू ठेवा.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ‘माहिती सुरक्षा शिक्षण आणि जागरूकता’ (Information Security Education and Awareness – ISEA) प्रकल्पाच्या माध्यमातून सायबर सुरक्षा आणि सायबर स्वच्छता (Cyber Aware Digital Citizens) याबद्दल जनजागृती करीत आहे.
ISEA प्रकल्पाच्या अंतर्गत, यावर्षीच्या ‘सुरक्षित इंटरनेट दिना’निमित्त, म्हणजेच दि.11 फेब्रुवारी रोजी देशभरात जनजागृती मोहीम चालविली जाईल. जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य https://staysafeonline.in/safer-internet-day येथे उपलब्ध आहे. जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC), जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांनी सर्व नागरिकांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपली ऑनलाईन सुरक्षा वाढवावी, असे आवाहन केले आहे.
००००
-अपर्णा यावलकर
माहिती अधिकारी, अमरावती