मुंबई, दि. ११:- मराठीतील ग्रामीण साहित्य चळवळीचा पैस वाढवणारे, नवोदित लेखकांना प्रोत्साहन आणि बळ देणाऱ्यांत बिनीचे शिलेदार ठरतील अशा प्रा. रा. रं. बोराडे यांचे निधन या चळवळीची हानी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्रा. रा. रं बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
प्रा. बोराडे यांना जाहीर झालेला विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला, हे दु:खद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘पाचोळाकार’ म्हणून लोकप्रियता मिळविणारे प्रा. बोराडे मराठीचे अध्यापन, साहित्य चळवळ अशा सर्वच ठिकाणी हिरीरीने पुढे राहिले. प्रा. बोराडे यांनी आपल्या अस्सल ग्रामीण साहित्यकृतींनी साहित्यात मोलाची भर घातली. देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्यपद त्यांनी भूषविले. अनेक साहित्यिक, नवोदितांसाठी ते मार्गदर्शक म्हणून आदरस्थानी होते. त्यांनी ग्रामीण साहित्य चळवळ आणि त्यातील विविध प्रवाहांना बळ दिले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रातील समर्पित सेवायात्री हरपल्याची भावना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. प्रा.बोराडे यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून, त्यांचे कुटुंबीय, चाहते यांच्या दु:खात सहभागी आहोत, असेही म्हटले आहे.