प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

सिद्धहस्त लेखक, प्रतिभावान साहित्यिक हरपला - उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 11: ज्येष्ठ साहित्यिक आणि ग्रामीण कथाकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. अस्सल ग्रामीण साहित्याच्या निर्मितीतून त्यांनी मराठी रसिकांना निखळ आनंद देण्याबरोबरच ग्रामीण भागातील प्रश्न, संघर्ष आणि जीवनशैली आपल्या लेखणीद्वारे रसिकांसमोर समर्थपणे उभी केली. त्यांच्या निधनाने सिद्धहस्त लेखक आणि प्रतिभावान साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले, “प्राचार्य रा. रं. बोराडे हे ग्रामीण साहित्याचे सशक्त आणि प्रभावी लेखक होते. त्यांच्या लेखणीतून साहित्य रसिकांना ग्रामीण जीवनाचे खरेखुरे चित्र पाहायला मिळाले. ‘पाचोळा’, ‘चारापाणी’, ‘मी आमदार सौभाग्यवती’ यांसारख्या कादंबऱ्यांतून आणि विविध कथासंग्रहांतून त्यांनी ग्रामीण भागातील प्रश्न, संघर्ष आणि जीवनशैलीला जिवंत केले. मागच्याच आठवड्यात त्यांना राज्य शासनाचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला होता. मात्र, त्या सन्मानाचा स्वीकार करण्याआधीच त्यांचे निधन होणे हे अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने प्रतिभावान साहित्यिक आणि कथाकथनकार हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”