छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियमची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी

नवी दिल्ली दि. 12 : मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे.

21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये हे साहित्य संमेलन दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे. त्या निमित्ताने मराठी भाषा मंत्री श्री. सामंत यांनी या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी साहित्य संमेलनाचे निमंत्रक सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, समन्वयक डॉ. शैलेश पगारिया तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

येथे विविध महापुरुषांच्या नावाने प्रवेशद्वार असणार आहेत. मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव असणार आहे. तर अतिविशिष्ट प्रवेशद्वाराला थोरले बाजीराव पेशवे हे नाव देण्यात आले. तसेच सभागृह क्रमांक एकला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे, तर सभागृह दोनला यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात येणार आहे. व्यासपीठाला  स्व. काकासाहेब गाडगीळ आणि स्व. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांची नावे असणार आहेत. 4000 व्यक्तींची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी सर्व सभागृहात होणार आहे, अशी माहिती श्री. नहार यांनी श्री. सामंत यांना या पाहणी दौऱ्याच्या वेळी दिली.

पुणे येथून विशेष रेल्वे 19 तारखेला सुटणार आहे यामध्येही साहित्यविषयक परिसंवाद तसेच कवी संमेलनाचे आयोजन होणार असल्याची माहिती श्री. नहार यांनी दिली. साहित्य संमेलनासाठी दिल्ली येथे होणारे नियोजन याचीही माहिती श्री. नहार यांनी श्री. सामंत यांना दिली. महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण पाठबळ या साहित्य संमेलनाला असल्याचे मराठी भाषा मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

000

अंजु निमसरकर/वृत्त वि. क्र.38  / दिनांक 12.02.2025