मुंबई, दि. 12 : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गावठाणाबाहेरील क वर्ग (बिनशेतीसाऱ्यास पात्र) जमिनींची वैयक्तिक मोजणी करुन त्या जमिनी नियमित कराव्यात, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील धारणाधिकार क गावठाण जमिनींचे नोंदणीकृत विक्रीपत्र करण्याबाबत मंत्रालयातील दालनात बैठक झाली. या बैठकीस गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अवश्यांत पंडा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गावठाण बाहेर क वर्ग जमिनीचे 4615 मालमत्ता पत्रक बनविण्यात आले आहेत. यापैकी 1500 हून अधिक प्रकरणी मोजणी झालेली नसून नगररचना विभागाची परवानगी नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत 2019 मध्ये स्थगितीचे आदेश देण्यात आले आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी मोजणी झालेल्या जमिनींवरील स्थगिती उठवून मोजणी न झालेल्या जमिनीची मोजणी करुन ती नियमित करणे अशा दोन टप्प्यांमध्ये प्रक्रिया करावी लागेल, अशी माहिती गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
ज्या जमिनीची मोजणी झाली नाही त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वैयक्तिक मोजणी करुन घ्यावी. याच्या शुल्कापोटी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून निधी उपलब्ध करुन घ्यावा आणि या जमिनी विक्रीपत्र करणे व हस्तांतरीत करण्यासाठी नियमित करुन घ्याव्यात, असे निर्देश श्री.बावनकुळे यांनी यावेळी दिले.
0000
बी.सी.झंवर/विसंअ/