मुंबई, दि. १३ : – हिंदुस्थानी संगीतातील स्वर भास्कर दिगंतात विसावला आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
धारदारआवाज आणि पल्लेदार तानांनी भारती संगीत क्षेत्राचे स्वर नभांगण उजळून टाकणारा किमयागार म्हणून ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर अजरामर राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, पंडित कारेकर यांचा स्वर म्हणजे हिंदुस्थानी संगीतातील अपूर्व ठेवा आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील गुरू-शिष्य परंपरेतील शिष्योत्तम म्हणता येईल, अशा पंडित कारेकर यांची सांगितीक कारकिर्द देदिप्यमान राहीली. त्यांनी आपल्या गुरूजनांचा नाव लौकिक जपला आणि सातासमुद्रापार नेला. पंडितजींच्या खास शैलीतील स्वरांनीच कित्येकांच्या दैनंदिनीची सुरवात होत असे. त्यांच्या स्वरांनी अभंग, भजन, नाट्यगीत ऐकणाऱ्यांची पिढी तयार केली. दर्दी रसिकांची दाद मिळविण्याबरोबरच, श्रोतृ वर्ग निर्माण करण्याचे कार्य पंडितजीच्या स्वरांनी केले. पंडितजींच्या निधनाने संगीत क्षेत्रातील तीन पिढ्यांना जोडणारा मार्गदर्शक दिगंतात विसावला. ते स्वरांनी अनंतकाळ आपल्या सोबतच राहतील. त्यांचे निधन ही भारतीय संगीत क्षेत्राची भरून निघणार नाही अशी हानी आहे. पंडितजीच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही कारेकर कुटुंबिय आणि पंडितजीच्या रसिक चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
०००