मुंबई दि. 14 : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नवी दिल्ली येथे ’98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे’. त्याअनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ’98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन’ आणि ‘मराठी भाषा गौरव दिनानिमित्त’ दिनांक 17 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत विशेष मुलाखतींचे प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखतींचे प्रसारण:
1) 98 वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्षा आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ‘अखिल भारतीय साहित्य संमेलनाची तयारी’ या विषयावर मुलाखत सोमवार दि. 17, मंगळवार दि. 18 आणि बुधवार दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांनी घेतली आहे.
2) इतिहास अभ्यासक प्रा. इंद्रजीत सावंत यांची ‘शिवकालीन मराठी भाषा’ या विषयावरील मुलाखत गुरूवार दि. 20 आणि शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतली आहे.
3) शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे प्रमुख तथा संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांची ‘मराठी संत साहित्याचे भाषेतील महत्व’ या विषयावरील मुलाखत शनिवार दि. 22 फेब्रुवारी, 2025 रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतली आहे.
4) लेखक आणि प्रशासक लक्ष्मीकांत देशमुख यांची ‘मराठी भाषेच्या विकासात साहित्य संमेलनांची भूमीका’ या विषयावरील मुलाखत सोमवार, दि. 24 आणि मंगळवार दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी घेतली आहे.
5) साहित्य अकादमीच्या केंद्रीय मंडळाचे सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृती मंडळाचे सदस्य, मराठी साहित्य व भाषा अभ्यासक डॉ. प्रमोद मूनघाटे यांची ‘मराठी भाषेचा उगम आणि साहित्य, शिक्षण आणि डिजिटल युगात मराठी भाषेचे महत्व’ या विषयावरील मुलाखत बुधवार, दि. 26, गुरूवार दि. 27 आणि शुक्रवार दि. 28, फेब्रुवारी 2025 रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक शिबानी जोशी यांनी घेतली आहे.
मराठी साहित्याच्या वैभवशाली परंपरेला नवा सन्मान मिळवून देणारे ’98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन’ 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पार होणार आहे. या संमेलनात देशभरातील साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत आणि वाचक एकत्र येणार आहेत. साहित्यिक दृष्टिकोन, नव्या लेखकांना मिळणारी संधी आणि विविध विषयांवरील विचारमंथन करणारे हे संमेलन केवळ एक कार्यक्रम न राहता मराठी संस्कृतीचा एक अभिजात सोहळा ठरणार आहे. तसेच 27 फेब्रुवारी 2025 रोजी ‘मराठी भाषा गौरव दिवस’ राज्यभरात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त मराठी भाषेचा उगम, इतिहास, संत साहित्य, शिवकालीन मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेचे स्थान व महत्व आदी विषयांवर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मान्यवरांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.