मुंबई दि. १४: पाटबंधारे महामंडळाकडील स्थावर मालमत्तांचे व्यवस्थापन नियोजन, निधी स्त्रोत बळकटीकरण व उभारणी, व्यावसायिक तत्त्वावर प्रकल्प उभारणी करण्यासाठी प्रतिथयश खासगी वित्तीय सल्लागाराची नेमणूक करण्याच्या सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील पाटील यांनी दिल्या.
सह्याद्री अतिथी गृह येथे जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ११२ वी बैठक झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता श्री. धुमाळ यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे आणि महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, महामंडळाच्या अखत्यारीत अनेक ठिकाणी विनावापर स्थावर मालमत्ता आहेत. याची माहिती संकलित होणे आवश्यक आहे. अशी माहिती संकलित झाल्यास या मालमत्तेचे व्यवस्थापन व त्यातून महामंडळास नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी सल्लागाराची मदत होईल.
जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली कामे कालबध्द रीतीने पूर्ण झाली पाहिजेत. या कामांचे सुयोग्य व सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जावी. गोदावरी नियामक मंडळाच्या ११२ व्या बैठकीत १५ कामांना मान्यता देण्यात आली. महामंडळासाठी कायदा सल्लागाराची नियुक्ती करण्यात यावी अशा सूचनाही मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिल्या.
०००००
एकनाथ पोवार/विसंअ