अभिजात मराठीचा गौरव… दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन…

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

मराठी साहित्य विश्वात साहित्य संमेलनाची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. कदाचित इतर भाषांमध्ये अशा पद्धतीचे साहित्य संमेलने क्वचित होत असावेत. साहित्य संमेलन भरवण्यासाठी शासन आर्थिक मदत करीत असल्यामुळे उत्तम पद्धतीने हा उपक्रम राबवता येणे शक्य झाले आहे. संमेलनामुळे लहान मोठे साहित्यिक एकत्रित आल्याने विषयांची देवाण-घेवाण होते. प्रेरणा, प्रोत्साहन मिळते. शिवाय विविध विषयांवर होणाऱ्या परिसंवादातून नवसाहित्यिकांना साहित्य व्यवहारातील विविध घडामोडींचे आकलन होत असते. नव्या विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा होत असल्यामुळे अनेक शंकांचे निरसन होत असते. वंचितांनाही स्थान मिळते. अमळनेर येथे झालेल्या 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात तृतीयपंथी तथा ट्रान्सजेंडर यांच्यासाठी परिसंवादाचे आयोजन केले होते. यातून साहित्यिकांना अनेक कथाबीज प्राप्त झाले असावेत. संमेलनाचा प्रमुख घटक म्हणजे ग्रंथ दालनं! अनेक मान्यवर प्रकाशकांचे पुस्तकांचे स्टॉल असल्यामुळे एकाच ठिकाणी आवडत्या पुस्तकांची खरेदी साहित्य रसिक, वाचकांना करता येते.

ग्रंथ वाचन आणि प्रसार यांना चालना मिळावी, साहित्यिकांनी एकत्रित येऊन चर्चा करावी, या उदात्त हेतूने न्यायमूर्ती रानडे यांनी साहित्य संमेलन भरवण्याची कल्पना लोकहितवादी यांच्याकडे मांडली. 1865 मध्ये झालेल्या ग्रंथगणनेनुसार 431 गद्यग्रंथ व 230 पद्यग्रंथ निर्मिती झाल्याचे आढळून आले. 1878 च्या फेब्रुवारीच्या ज्ञानप्रकाशच्या अंकातून जाहिरात वजा साहित्यिकांना एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आल्यावर पुणे येथील हिराबागेत 11 मे, 1878 रोजी न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले साहित्य संमेलन भरले.

नुकतेच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्याच अनुषंगाने 98 वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत संपन्न होणार आहे. देशाच्या राजधानीत सुमारे 70 वर्षानंतर हे संमेलन होत आहे. या संमेलनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी उद्घाटन करणार आहेत. एवढा मान क्वचित इतर कुठल्या भाषेला मिळाला असेल, असा प्रश्न सुखावणारा आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार हे स्वागताध्यक्ष असणार आहेत. आणि या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिल्ली राजधानीत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मराठी भाषिक मोठ्या संख्येने स्थिरावलेले आहेत. त्यांचेही स्नेहसंमेलन या निमित्ताने होणार आहे. आपल्या भाषेवर प्रत्येकाचे प्रेम असते, अभिमान असतो. प्रत्येक वाचकाचे दैवत एखादा लेखक असतो. अशा दैवत लेखकाला प्रत्यक्ष पाहण्याचा, ऐकण्याचा योग यानिमित्ताने येणार आहे, असं म्हटलं तर ही वाचकांसाठी पर्वणीच म्हणता येईल.

‘दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा’ ही केवळ कवी कल्पना नसून ती पूर्वी आणि आत्ताही सत्यरूप घेऊन अवतरत आहे. राजधानी दिल्लीचे रक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली होती. आताही दिल्लीत शेकडो मराठी लोक विविध अधिकारपदावर कार्यरत आहेत. दिल्लीचे रक्षण करीत आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी देश रक्षणात बहुमूल्य कामगिरी बजावलेली आहे. ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला’ हे शब्द आजही मराठी मनावर रुंजी घालत आहेत.

मराठीची उज्ज्वल पताका संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा आणि सत्तर वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर दिल्लीच्या ऐतिहासिक तालकटोरा येथे हे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या रूपाने फडकणार आहे, याचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला आहे. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन हे पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णपान ठरावे असेच आहे. मराठी माणूस, सारस्वत, प्रकाशक, वाचक, रसिक आणि मराठी अभिजात भाषा हे सगळेच जगाच्या साहित्य विश्वात ठळक नोंद घेणारे आहे, यात शंका नाही.

अभिजात भाषेचा दर्जा उंचावला पाहिजे, या अनुषंगाने मराठी साहित्यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन व्हावे, दर्जेदार निर्मिती व्हावी, प्रचार – प्रसार व्हावा, यासाठी पूरक असे हे दिल्लीत भरणारे मराठी साहित्य संमेलन असणार आहे. मराठी बाणा कसा असतो याचा अनुभव दिल्लीकरांना करून देण्यासाठी जास्तीत जास्त मराठीच्या अनुयायांनी या संमेलनात सहभागी व्हावे. सर्वच पातळीवर हे संमेलन यशस्वी होण्यासाठी आपण मराठी म्हणून कटिबद्ध असायला पाहिजे.

मराठी भाषेने नेहमीच देशातील नव्हे, तर परदेशीय भाषांना आदराने जवळ केलेले आहे. सगळ्याच भाषांचा स्वीकार करणारी मराठी भाषा, अनेक बोलींनी समृद्ध असणारी मराठी भाषा, जाज्वल्य लोक इतिहास, लोकपरंपरा, लोकसंस्कृती, लोकसाहित्याने नटलेल्या मराठी भाषेचा सन्मान आज सत्तर वर्षांनी पुन्हा एकदा दिल्लीत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने होत आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी व मराठीचे कौतुकाचे साक्षीदार होण्यासाठी संमेलनास उपस्थिती आवश्यक आहे. आपणच आपल्या भाषेचा गौरव करणार नाही तर मग कोण करणार?

प्रा. संजीव गिरासे

प्राचार्य, स्व. आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी, ता. साक्री, जि. धुळे.

भ्रमणध्वनी 9325534511