छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही दिशादर्शक- पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.१९ (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज भुत, भविष्य आणि वर्तमान बदलणारे दैवत, अद्भूत शक्ती होते. त्यांनी ३५० वर्षापूर्वी राबविलेली निती, धोरणे आजच्या काळातही आम्हा सगळ्यांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

शिव जयंतीनिमित्त प्रशासनाच्यावतीने ‘जय छत्रपती शिवाजी – जय भारत’ पदयात्रेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी पालकमंत्री श्री.राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड आदी उपस्थित होते.

महाराजांचे कार्य, शौर्य, सामाजिकता, त्यांनी त्या काळात राबविलेली ध्येय, धोरणे युवा पिढीला समजावी यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने संपुर्ण भारतभर जय छत्रपती शिवाजी – जय भारत पदयात्रा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराजांनी त्या काळात स्वराज्य निर्मितीसाठी वापरलेले कौशल्य आजही तितकेच महत्वाचे आहे. राज्याच्या, समाजाच्या विकासासाठी महाराजांच्या कामाचे अनुकरण दिशादर्शक आहे, असे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले.

महाराजांचे कार्य डोळ्यासमोर ठेऊन सुराज्य उभे करण्याचा प्रयत्न राज्यात केला जात आहे. महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर आपण सगळे मार्गक्रमन करीत आहोत. भारत युवकांचा देश आहे. देशाच्या विकासात युवकांचे महत्वाचे योगदान लाभणार आहे. त्यामुळे युवकांना महाराजांचे कार्य अवगत होणे फार आवश्यक आहे. पदयात्रेच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाराज समजून घेता येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी राज्यातील संपुर्ण ३६ जिल्ह्यांमध्ये पदयात्रा काढण्यात आली आहे. महाराजांचे कार्य यातून युवा पिढीला समजेल असे सांगितले. डॅा.ताराचंद कंठाळे यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे व्याख्यान दिले. शिवाजी महाराज आदर्श राजा होते. वेगवेगळ्या लोकांना सोबत घेऊन कल्याणाचे काम त्यांनी केले. स्त्रीयांचा अवमान होणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. स्त्रीयांसाठी स्वतंत्र खाते त्यांनी त्यावेळी केले होते. अस्पृश्यता निवारण, सामाजिक समरसता यासाठी देखील महाराजांचे कार्य होते, असे डॅा.कंठाळे यांनी सांगितले

सुरुवातीस पालकमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. पालकमंत्री पदयात्रेत देखील सहभागी झाले होते. पदयात्रेत विविध शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पथकांनी ढोलताशा, लेझिम, पांरपारिक वेषभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम, मल्लखांब, पारंपारिक व ऐतिहासिक बाबींचे सादरीकरण केले. शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप झाला.

0000