मराठी भाषेचा अभिजात प्रवास: ‘दर्पण’ ते 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून, ती एक समृद्ध विचारधारा, संस्कृती आणि परंपरेचा अभिमानास्पद वारसा आहे. संस्कृतप्रभव असलेल्या या भाषेने अनेक संत, कवी, समाजसुधारक आणि साहित्यिक यांच्याकडून आपल्या विचारांची सखोल मांडणी केली आहे. तिच्या अभिव्यक्तीचे आणि साहित्यिक सामर्थ्याचे महत्त्व लक्षात घेऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान केवळ भाषेच्या ऐतिहासिक प्रवासाचा पुरस्कार नसून, तिच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्याची जागतिक पातळीवरील मान्यता आहे.
मराठी भाषेच्या या गौरवशाली प्रवासात बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून लोकशिक्षणाचा पाया रचला. त्यांच्या कार्यामुळे मराठी भाषा विचार, चर्चा आणि सामाजिक परिवर्तनासाठी सक्षम बनली. त्यांची जयंती २० फेब्रुवारी रोजी आणि लगेच दुसऱ्या दिवशी दिल्ली येथे होणारे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, हा एक विलक्षण योग आहे.
बाळशास्त्री जांभेकर आणि ‘दर्पण’चा प्रभाव
बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते. ब्रिटिश सत्तेखाली असलेल्या भारतात मराठीतून विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी त्यांनी ‘दर्पण’ सुरू केले. त्या काळी इंग्रजी वृत्तपत्रे प्रामुख्याने ब्रिटिशांच्या हितसंबंधांना महत्त्व देत होती, त्यामुळे स्थानिक जनतेसाठी माहितीचा स्रोत नव्हता.
‘दर्पण’मध्ये केवळ बातम्या नव्हत्या, तर त्यात सामाजिक सुधारणांवर प्रकाश टाकणारे लेख, शिक्षणाचा प्रचार, राजकीय घडामोडींचे विश्लेषण आणि जनजागृतीचे कार्य केले जात असे. त्यांनी भारतातील तसेच जगभरातील राजकीय घडामोडींचे संक्षिप्त आणि समर्पक वर्णन केले. जनतेला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करणे आणि समाजातील अनिष्ठ रूढी, अंधश्रद्धा दूर करणे हा जांभेकरांचा मुख्य हेतू होता.
त्यानंतर मराठी पत्रकारितेचा विस्तार होत गेला आणि पुढे ‘केसरी’, ‘सुधारक’ व आजवरच्या अनेक वृत्तपत्रांनी सामाजिक आणि राजकीय विचारप्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली. ‘दर्पण’च्या प्रभावामुळे मराठी भाषा फक्त साहित्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती वैचारिक मंथन आणि लोकशिक्षणासाठी प्रभावी माध्यम बनली.
मराठी भाषा: अभिजाततेचे वैशिष्ट्य
मराठी भाषेचा इतिहास हजारो वर्षे प्राचीन आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, समर्थ रामदास यांचे अभंग आणि ओव्या हे मराठी भाषेचे पहिले अभिजात साहित्य मानले जाते. संत साहित्यातून भावसंपन्नता, आध्यात्मिकता आणि सामाजिक परिवर्तनाची तत्त्वे प्रकट झाली. पुढे शाहिरी काव्य, लोककथा, ऐतिहासिक बखरी आणि नाट्यसाहित्याच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रवास अधिक विस्तृत झाला.
१८व्या आणि १९व्या शतकात सामाजिक सुधारकांनी मराठी भाषेतून स्त्री-शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, विज्ञानप्रसार आणि लोकशिक्षण यांसारख्या विषयांवर लेखन केले. टिळक, आगरकर, फडके, केशवसुत यांसारख्या विचारवंतांनी मराठीतून समाजप्रबोधन करत भाषा अधिक समृद्ध केली.
अभिजात भाषेच्या दर्जासाठी आवश्यक महत्त्वाचे निकषांमध्ये प्राचीन आणि समृद्ध साहित्य परंपरा, स्वतःची लेखनसंस्कृती आणि व्याकरण असणे, संस्कृती, परंपरा आणि ज्ञानपरंपरा यात महत्त्वाचे योगदान असणे अनेक पिढ्यांमध्ये अबाधित अस्तित्व असणे या सर्व निकषांवर मराठी भाषा योग्य ठरली आणि त्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. हा दर्जा मिळणे म्हणजे मराठीला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक महत्त्व मिळणे आणि भाषेच्या अभ्यासासाठी विशेष अनुदाने उपलब्ध होणे.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली
दिल्ली येथे २१ २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी मराठी साहित्यिक, लेखक, कवी आणि वाचक एकत्र येऊन साहित्याच्या नव्या दिशा ठरवतात.
यंदा हे संमेलन अधिकच विशेष ठरणार आहे कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले साहित्य संमेलन आहे. या संमेलनात मराठी साहित्याच्या भविष्यकालीन वाटचालीबाबत चर्चा होणार असून, डिजिटल युगात मराठी भाषेचे अस्तित्व आणि जागतिक स्तरावर तिच्या संवर्धनासाठी कोणते प्रयत्न करावेत यावर विचारविनिमय होईल.
मराठी भाषा: पुढील दिशा
बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’च्या माध्यमातून मराठी भाषेला वैचारिक अभिव्यक्तीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आज विविध माध्यमांच्या मदतीने आपल्याला मराठी भाषा आणि साहित्य अधिक व्यापक स्तरावर नेण्याची संधी आहे.
‘दर्पण’ने घालून दिलेल्या वाटेवर चालत आज मराठी भाषा नव्या संधींसाठी सज्ज आहे. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी नवे धोरण आखणे, साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार करणे आणि नवीन लेखकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य आपसूकच होणार आहे. मराठी भाषा ही केवळ एक संवादाचे माध्यम नाही, तर ती विचार, संस्कृती आणि सृजनात्मकतेचा उत्सव आहे. या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगून तिचे भविष्यातील स्थान अधिक भक्कम करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत.
– गजानन जाधव, जिल्हा माहिती अधिकारी गडचिरोली