सातारा, दि. २०: पाणी टंचाईस एप्रिल महिन्यापासून सुरुवात होते. ग्रामीण भागातील नागरिकांना टंचाई भासू नये, यासाठी जल जीवन मिशन अंतर्गतची कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात पालकमंत्री श्री. देसाई यांनी जल जीवन मिशन अंतर्गतच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, यांच्यासह जिल्हा परिषदेमधील संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील नागरिक पाण्यापासून वंचित राहू नयेत यासाठी मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश देवून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, विद्युत जोडणीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच निधी कमी पडत असल्यास १५ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करुन घ्यावा. नळ जोडण्यांचे काम प्राधान्याने हाती घ्यावा. जिल्हा परिषदेमधील संबंधित अधिकाऱ्यांनी गाव भेटी देवून वेळोवेळी कामांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.
या बैठकीनंतर लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटणच्या विस्तारीत इमारतीचा आढवा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या पंचायत समितीचा आणखी एक मजला वाढवायचा आहे. यासाठी साडे पाच कोटींचा निधी लागणार असून या निधीसाठी पाठपुरावा केला जाईल असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.
0000